Pune : टेमघर दुरुस्तीचे काम निधीअभावी रखडले

पुणे : टेमघर धरणाच्या एका बाजूची दुरुस्ती पूर्ण झाली असून, धरणाला आता कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मात्र, दुसऱ्या बाजूची दुरुस्ती अद्यापही बाकी आहे. या शिल्लक राहिलेल्या कामामध्ये फाउंडेशन ट्रिटमेंट आणि ग्राउटिंगच्या कामांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थेकडून देण्यात आली.
‘सीडब्लूअॅन्डपीआरएस’ संस्थेकडून आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे संचालक डॉ. आर. एस. कांकारा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाल्यानंतर जलसंपदा विभागाकडून संस्थेकडे मदत मागण्यात आली. त्यानुसार संस्थेच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी करून सिमेंट, सिलिका, फ्लॅश ॲश यांसारखी सात प्रकारचे घटक एकत्रित करून मिश्रण तयार केले. ड्रिलिंग, ग्राउटिंग या पद्धतीने धरणाच्या बाहेरील बाजूच्या भिंतींमध्ये ९० अंशाच्या कोनात ड्रिलच्या साह्याने छिद्रे पाडण्यात आली. या छिद्रांमध्ये संस्थेने संशोधन करून तयार केलेले हे मिश्रण सोडण्यात आले. त्यामुळे धरणाची ९० टक्के गळती थांबविण्यात यश मिळाले आहे.
टेमघर धरणाचे काम सन २०१० मध्ये पूर्ण झाले आणि तेव्हापासून धरणात पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली. धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली. यानंतर धरण दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. पाणीसाठा असताना दुरुस्ती शक्य नसल्याने धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत होते. त्यानंतरच दुरुस्ती करण्यात येत होती. गळती प्रतिबंधक कामे सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली. या कामांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ड्रिलिंग, ग्राउटिंग या पद्धतीने धरण दुरुस्तीचे काम करण्यात आले. धरण दुरुस्तीचे हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात धरणाच्या आतील बाजूस सिमेंटच्या आच्छादीकरणाचे काम अर्धवट अवस्थेतच राहिले आहे. करोनाची दोन वर्षे आणि त्यानंतर धरणाच्या दुरुस्तीस निधी न मिळाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही.
धोका टळला
धरण सुरक्षेची कामे केल्यामुळे पावसाळ्यात हे धरण १०० टक्के भरले जाते. धरणाला असलेला धोका टळला आहे. मात्र, धरण सुरक्षेची एकाच बाजूची कामे झाली असून, अद्यापही दुसऱ्या बाजूची कामे शिल्लक आहेत. त्यामध्ये फाउंडेशन ट्रिटमेंट, ग्राउटिंग या कामांचा समावेश आहे, असे संस्थेचे अतिरिक्त संचालक डॉ. प्रभात चंद्र यांनी सांगितले.





