‘दिल्लीत संभाषणासाठी हिंदी महत्त्वाची’, भाषा वादात आणखी एका मुख्यमंत्र्यांची उडी; स्टॅलिन यांना दिला सल्ला

CM Chandrababu Naidu on Hindi Language Row | तामिळनाडूमधील स्टॅलिन सरकारने हिंदी भाषेविरोधातील लढा तीव्र केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्राद्वारे केंद्र सरकार हिंदी लादत असल्याचा आरोप स्टॅलिन सरकारने केला आहे. दक्षिणेकडील इतर राज्यातील नेते देखील स्टॅलिन यांना पाठिंबा देत आहेत. मात्र, दुसरीकडे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टीडीपीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
हिंदी भाषेचा द्वेष केला जाऊ नये. दिल्लीत संभाषणासाठी हिंदी ही खूप उपयुक्त भाषा आहे, असे वक्तव्य करत चंद्राबाबू नायडू यांनी करत एमके स्टॅलिन यांना मोठा धक्का दिला आहे. एकीकडे हिंदी लादत असल्याचा आरोप करत स्टॅलिन यांनी केंद्र सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. त्यातच आता दक्षिणेकडील प्रमुख राज्य असलेल्या आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेबद्दल असे वक्तव्य केल्याने हा स्टॅलिन यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
भाषा वादात नायडू यांनी तडजोडीची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे स्वतःचे महत्त्व असून, दोन्ही शिकल्या पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. चंद्राबाबू नायडू म्हणाले की, हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. भारतीय नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये जात आहेत. म्हणून, आपण उपजीविकेसाठी कोणतीही भाषा शिकू शकतो. पण आपण आपली मातृभाषा विसरू नये.
भाषा ही फक्त संवादासाठी असते. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की शक्य तितक्या भाषा शिकणे चांगले, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, दुसरीकडे एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेवरून केंद्र सरकार व भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतेच त्यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पात ‘₹’ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह वापरले आहे. हे चिन्ह तमिळ लिपीतील ‘रु’ अक्षर आहे. राज्य सरकारकडून राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध केला जात आहे. स्टॅलिन यांनी हे भगवे धोरण असल्याचेही म्हटले आहे.





