Pavel Durov: टेलिग्राम सीईओचा रिलायन्सवर गंभीर आरोप; ‘BGP Hijacking’मुळे जगभरातील वापरकर्त्यांवर परिणाम होत असल्याचा दावा
Pavel Durov पावेल ड्युरोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ तांत्रिक बिघाड नाही, तर एक नियोजित कृती असू शकते. त्यांनी सांगितलं की, या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, पण त्यावर कोणतीही सुधारात्मक पावलं उचलली गेली नाहीत.

Pavel Durov: लोकप्रिय मेसेजिंग अॅप टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पावेल ड्युरोव्ह यांनी भारतीय दूरसंचार कंपनी रिलायन्सवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, रिलायन्स कथितपणे ‘बीजीपी हायजॅकिंग’ (BGP Hijacking) या तांत्रिक पद्धतीचा वापर करून भारताबाहेरील अनेक देशांमध्ये टेलिग्रामच्या सेवांमध्ये अडथळे निर्माण करत आहे.
ड्युरोव्ह यांनी दावा केला की, या प्रकाराचा परिणाम संयुक्त अरब अमिरातीसह (UAE) अनेक देशांतील लाखो वापरकर्त्यांवर होत आहे. मात्र, त्यांनी या आरोपांच्या समर्थनार्थ कोणतेही स्वतंत्र आणि सार्वजनिक तांत्रिक पुरावे सादर केलेले नाहीत.
नेमकं काय आहे प्रकरण?
पावेल ड्युरोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ तांत्रिक बिघाड नाही, तर एक नियोजित कृती असू शकते. त्यांनी सांगितलं की, या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, पण त्यावर कोणतीही सुधारात्मक पावलं उचलली गेली नाहीत.
त्यांनी विशेषतः ‘बीजीपी हायजॅकिंग’चा उल्लेख केला. इंटरनेटवर डेटा एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कपर्यंत पोहोचवण्यासाठी BGP (Border Gateway Protocol) या प्रणालीचा वापर केला जातो. या प्रक्रियेमध्ये छेडछाड झाल्यास इंटरनेट वाहतुकीचा मार्ग बदलू शकतो आणि काही वेबसाइट्स किंवा अॅप्सपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
मेटा आणि व्हॉट्सअॅपचाही उल्लेख (Pavel Durov)
ड्युरोव्ह यांनी या वादाला व्यावसायिक स्पर्धेशी जोडण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रिलायन्समध्ये मेटाची भागीदारी आहे आणि मेटाच व्हॉट्सअॅपची मूळ कंपनी आहे. त्यामुळे टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांच्यातील वाढत्या स्पर्धेमुळे हा प्रकार घडत असावा, असा त्यांचा अंदाज आहे. मात्र, त्यांनी याबाबत कोणताही थेट पुरावा सादर केलेला नाही.
Telegram
नेटवर्क ऑपरेटर्सना दिला इशारा (Pavel Durov)
पावेल ड्युरोव्ह यांनी जगभरातील नेटवर्क ऑपरेटर्सना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. रिलायन्सच्या AS18101 या ऑटोनॉमस सिस्टम नंबरमधून येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत BGP घोषणांना स्वीकारू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या मते, असं केल्यास संभाव्य रूट हायजॅकिंग रोखता येईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित आणि अखंड सेवा मिळू शकेल.
टेलिग्राम बंदीच्या मागणीवरही प्रश्नचिन्ह (Pavel Durov)
भारतामध्ये टेलिग्रामवर बंदी घालण्याच्या मागणीवरही ड्युरोव्ह यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, अशा प्रयत्नांमागेही व्यावसायिक हितसंबंध असू शकतात. मात्र, या दाव्याचं समर्थन करणारे कोणतेही प्रत्यक्ष पुरावे त्यांनी दिलेले नाहीत.
रिलायन्सकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
या संपूर्ण प्रकरणावर रिलायन्स, मेटा किंवा व्हॉट्सअॅपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच ड्युरोव्ह यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्ररीत्या पडताळणीही झालेली नाही. त्यामुळे सध्या हे सर्व दावे टेलिग्रामच्या प्रमुखांनी केलेले आरोप म्हणूनच पाहिले जात आहेत. संबंधित संस्थांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे इंटरनेट सुरक्षा, डिजिटल स्पर्धा आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमधील वाढती स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.





