महबुबाबाद (तेलंगण) : पती आणि सासरच्या लोकांमधील जमिनीचा वाद सोडवण्यात स्थानिक उपनिरीक्षकाने छळ केल्याचा आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तेलंगणच्या थोरुरमध्ये एका महिलेने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिली. ५० वर्षे पूर्ण झालेल्या शोले या चित्रपटातील वीरु अर्थात धर्मेंद्र बसंतीसाठी अर्थात हेमा मालिनीसाठी पाण्याच्या टाकीवर चढला होता. तेव्हापासून धमकीचा हा प्रकार आजही सुरु आहे. आंबेडकर नगर येथील एम. यकांथा या महिलेने एक फलक दाखवला. त्यावर लिहिले होते – एसआय उपेंदरवर कारवाई करा आणि आम्हाला न्याय द्या, नाहीतर आम्ही मरून जाऊ. यकांथाने आरोप केला की, उपनिरिक्षक जी. उपेंदर तिच्या सासरच्यांना अनुकूलता दाखवत असून यकांथाच्या नकळत स्टॅम्प पेपरवर त्यांनी जमिनीचा तोडगा काढला. यकांथा दोन महिन्यांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होती आणि तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही निषेधाची माहिती मिळताच, पलकुर्तीच्या आमदार ममिदला यशस्विनी रेड्डी यांनी यकांथा यांच्याशी फोनवर बोलून कारवाईचे आश्वासन दिले, त्यानंतर ती खाली उतरली. नंतर यकांथा यांनी सांगितले की, तिने ३० सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती की, एसआयने लाच घेतल्याचा आरोप केल्यानंतर तिच्या पतीचे भाऊ यकाय्या आणि रवी कुमार यांना २२ गुंठे जमीन मिळाली. तिचा पती प्रसाद ६ ऑक्टोबर रोजी एसआयशी संपर्क साधूनही कोणतीही कारवाई झाली नाही. एसपी सुधीर रामनाथ केकन म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि तथ्यांच्या आधारे कारवाई केली जाईल.