Telangana Election Result 2023 : चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता तेलंगणात भारत राष्ट्र समिती (BRS), भाजप आणि काँग्रेस (Congress) यांच्या लढत झाली आहे. 30 नोव्हेंबर रोजी राज्यातील 119 विधानसभा जागांवर 70.66 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आता तेलंगणात या तिन्ही पक्षापैकी नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तेलंगणा हे जून 2014 मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळे होऊन नवीन राज्य म्हणून स्थापन करण्यात आले. या वर्षी राज्यात पहिली विधानसभा निवडणूक झाली. यामध्ये तेलंगणा वेगळे राज्य बनवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या टीआरएस (तेलंगणा राज्य समिती) आताची भारत राष्ट्र समिती बीआरएस झाली आहे. या पक्षाला बहुमत मिळाले. तेव्हा टीआरएसला 63, काँग्रेसला 21, टीडीपीला 15 आणि इतरांना 20 जागा मिळाल्या. तेलंगणाच्या वेगळ्या मागणीसाठी आंदोलन करणारे टीआरएस नेते के. चंद्रशेखर राव हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. सध्या विधानसभेच्या 119 जागांपैकी सत्ताधारी बीआरएसकडे 101 आमदार आहेत. तर असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM चे 7 आमदार आहेत. काँग्रेसकडे 5, भाजपकडे 3, एआयएफबीकडे 1, एक नामनिर्देशित आणि एक अपक्ष आमदार आहे. मात्र तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनुसार काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तेलंगणात भारत राष्ट्र समितीपेक्षा काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.