मुंबई : मंगळवारी मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली. काही महत्त्वाचे प्रभाग आरक्षित झाल्याने येथील माजी नगरसेवकांना आपला प्रभाग सोडावा लागणार आहे. त्यामुळे काही जण अन्य प्रभागातून देखील निवडणूकीची चाचपणी करत आहेत. शिवसेनेच्या (उबाठा) युवा नेत्या व माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा प्रभाग देखील आरक्षित झाल्याने त्यांची देखील कोंडी झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडीया अकाउंटद्वारे आपण निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील वॉर्ड आरक्षणाची लॉटरी जाहीर झाली आहे. माझ्या वॉर्ड क्रमांक १ मधील जागा ओबीसी (इतर मागासवर्गीय) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे मी ही निवडणूक लढवू शकणार नाही. हा निर्णय खरोखरच निराशाजनक आहे. मी निवडणूक लढवू शकले नाही तरी मी माझ्या वॉर्डातील आणि दहिसर विधानसभा मतदारसंघातील जनतेची लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करणे कायम ठेवणार आहे. हा निर्णय माझ्या सार्वजनिक सेवेच्या प्रवासात अडथळा आणणार नाही. अभिषेकच्या अकाली निधनापासून मला घोसाळकर कुटुंबाकडूनच नव्हे तर माझ्या वॉर्ड, दहिसर आणि बोरिवलीतील प्रत्येक रहिवाशांकडून अपार प्रेम, विश्वास आणि पाठिंबा मिळाला असल्याचे देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची गेल्या वर्षी फेसबुक लाईव्ह करुन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तेजस्वी या ठाकरे गटाचे दिग्गज नेते विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई आहेत. पक्षांतर्गत नाराजीतून तेजस्वी घोसाळकर यांनी संघटनेतील पदांचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर त्या पक्षांतर करण्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. परंतु उद्धव ठाकरे यांच्या भेटीत त्यांची नाराजी दूर झाली. मात्र आता त्यांचा प्रभाग ओबीसी महिलांना आरक्षित झाल्यामुळे त्यांचे महापालिकेत पुन्हा लोकप्रतिनिधी होण्याचे स्वप्न दूर झाले आहे.