Tejashwi Yadav : इंडिया आघाडी नेत्याची निवड सहमतीने व्हावी; तेजस्वी यादव यांनी मांडली भूमिका

कोलकता : विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणी करावे, असा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. त्याविषयी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी सावध भूमिका मांडली आहे. आघाडीच्या नेत्याची निवड सहमतीने व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकतेच इंडिया आघाडीच्या कामकाजाविषयी असमाधान व्यक्त केले.
एवढेच नव्हे तर, संधी मिळाल्यास आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आघाडीमधील घटक पक्ष नेतृत्वाविषयी वेगवेगळे सूर आळवू लागले आहेत. संबंधित मुद्द्यावर पत्रकारांनी येथील विमानतळावर तेजस्वी यांना प्रश्न विचारला. उत्तरादाखल त्यांनी ममतांकडे आघाडीचे नेतृत्व सोपवण्यास आमची कुठली हरकत नसल्याचे म्हटले.
अर्थात, आमच्या आघाडीत अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे एकत्र बसून नेतृत्वाविषयी सर्वानुमते निर्णय घेण्याची गरज आहे. अद्याप त्यावर कुठला विचारविनिमय झालेला नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मोठा पक्ष म्हणून सध्या कॉंग्रेसच इंडिया आघाडीचे अनौपचारिकपणे नेतृत्व करत आहे. आघाडीची धुरा कुठल्या विशिष्ट नेत्याकडे सोपवण्यात आलेले नाही.




