Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांनी अमित शहांना दिले जाहीर चर्चेचे आव्हान

पाटणा : राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत त्यांना जाहीर चर्चेचे आव्हान दिले. बिहारच्या विकासात राजदचे योगदान किती आणि भाजपचा समावेश असणाऱ्या एनडीएचे किती यावर बोलण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी त्यांनी वेळ आणि ठिकाण सांगावे, असे तेजस्वी यांनी म्हटले.
शहा यांनी नुकताच बिहारचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटूंबीयांवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्या टीकेचा लालूपुत्र तेजस्वी यांनी याआधी सोशल मीडियावरून समाचार घेतला. त्यानंतर मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा शहांना लक्ष्य केले. सध्या बिहारला जेवढा केंद्रीय निधी मिळतो; त्यापेक्षा कितीतरी अधिक निधी माझ्या वडिलांनी प्राप्त केला होता.
घराणेशाहीवरून शहा आमच्यावर टीका करतात. मात्र, ते चिराग पासवान आणि जितनराम मांझी या मित्रपक्षांच्या नेत्यांविषयी त्या मुद्द्यावरून बोलत नाहीत, असे ते म्हणाले. निवडणूक वर्षात देशभरातून भाजपचे नेते बिहारमध्ये राजकीय पर्यटनासाठी येतील. खोट्या घोषणा आणि मोठमोठे दावे करतील, असा पलटवार तेजस्वी यांनी याआधी केला होता. बिहारमध्ये वेळापत्रकानुसार चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल.



