Tej Pratap Yadav : तेजप्रताप यांच्या हकालपट्टीचे अधिकृत पत्र जारी

पाटणा : तेज प्रताप यादव यांची आता अधिकृतपणे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अनुष्का यादव प्रकरण उघडकीस आल्यानंतर, लालू यादव यांनी २५ मे रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते की तेज प्रताप यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. आतापासून त्यांना पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. आता राष्ट्रीय जनता दलाने यासंदर्भात जारी केलेले पत्रही समोर आले आहे.
आरजेडीचे राष्ट्रीय प्रधान महासचिव अब्दुल बारी सिद्दीकी यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, माननीय राष्ट्रीय अध्यक्षांच्या सूचनांनुसार, श्री तेज प्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्यात येत आहे. हे पत्र २५ मे रोजीचे आहे, परंतु पक्षाने गेल्या रविवारी ते सार्वजनिक केले आहे. हे पत्र समोर आल्यानंतर, तेज प्रताप यादव यांना आता अधिकृतपणे पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
पत्रात लालू यादव यांच्या आदेशाचा स्पष्ट उल्लेख आहे. दरम्यान, तेज प्रताप यांना राजदमधून काढून टाकण्यात आले असले तरी त्यांचे (तेज प्रताप यादव) कुटुंबावरील प्रेम ओसंडून वाहत आहे. गेल्या रविवारी तेज प्रताप यादव यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, तुम्ही दिलेला कोणताही आदेश देवापेक्षा मोठा आहे. मला फक्त तुमचा विश्वास आणि प्रेम हवे आहे, दुसरे काहीही नाही.





