पुणे | तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील पाॅलिटेक्निक डिप्लोमा अर्थात तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाला दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवलेल्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर ९१ ते ९९ टक्के गुण मिळवलेले १० हजार २९६ विद्यार्थी पदविका प्रवेशासाठी इच्छुक आहेत. यावरून डिप्लोमा प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पाॅलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये सुमारे सव्वालाख विद्यार्थ्यांपैकी १४ विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवलेले असून, ८१ ते ९० टक्के गुण मिळवलेले ३७ हजार ९३२, तर ७१ ते ८० टक्के गुण मिळवलेले ३६ हजार ५५३ विद्यार्थी आहेत.
या प्रवेशासाठी यंदा १ लाख ५५ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. त्यापैकी १ लाख २७ हजार ९७२ विद्यार्थ्यांचे अर्ज सुविधा केंद्रांद्वारे निश्चित करण्यात आले आहेत.गुणवत्ता यादीमध्ये एकूण ८४ हजार ४६३ मुले आणि ४३ हजार ५०९ मुली आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालयाकडून अंतिम गुणवत्ता यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या केंद्रीभूत प्रवेश फेरीसाठीचे पसंतीक्रम २६ ते २९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार झालेले पहिल्या फेरीचे जागावाटप संचालनालयाकडून ३१ जुलै रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशाच्या तीन फेऱ्या घेण्यात येणार आहेत.
गुणवत्ता यादीमध्ये १४ विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवलेले, १० हजार २९६ विद्यार्थी ९१ ते ९९ टक्के गुण मिळवलेले, ३७ हजार ९३२ विद्यार्थी ८१ ते ९० टक्के गुण मिळवलेले, तर ३६ हजार ५५३ विद्यार्थी ७१ ते ८० टक्के गुण मिळवलेले आहेत. त्यामुळे पदविका अभ्यासक्रमात सर्वाधिक विद्यार्थी ८१ ते ९० टक्के गुण मिळवलेले असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.


