बंगळुरू : पत्नीवर गंभीर आरोप करत एका खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव अतुल सुभाष असे असून तो सध्या बंगळुरूतील मंजुनाथ लेआउटमधील डेल्फिनियम रेसिडेन्सीत येथे वास्तव्यास होता. अतुल याने आत्महत्येपूर्वी २४ पानांची सुसाईड नोट लिहली आहे, यात पत्नी, सासरची मंडळी आणि एका न्यायाधीशावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ६ वाजता होयसळा पोलिस नियंत्रण कक्षाला मंजुनाथ लेआउटमधील एका फ्लॅटमध्ये आत्महत्येची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी फ्लॅट आतून बंद असल्याचे आढळले. दरवाजा तोडून आत प्रवेश करताच त्यांनी अतुल सुभाष याला छताच्या पंख्याला नायलॉन दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत पाहिले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. पत्नी आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप पोलिसांनी घटनेची माहिती मृताचा भाऊ , बिकास कुमार याला दिली. बिकास याने भावाची पत्नी, सासू, मेहुणा आणि पत्नीच्या काकावर खोट्या तक्रारी दाखल केल्याचा आणि ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला. या मानसिक आणि शारीरिक छळामुळेच आपल्या भावाने आत्महत्या केल्याचे त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सखोल तपास सुरू आहे. “जस्टिस इज ड्यू….” अतुल याने सुसाईड नोटमधून अनेक आरोपांना वाचा फोडली आहे. २४ पानांच्या या नोटमधील प्रत्येक पानावर “जस्टिस इज ड्यू” असे लिहिले आहे. पत्नी, सासरच्या मंडळींबरोबरच उत्तर प्रदेशातील जौनपूर कुटुंब न्यायालयातील एका न्यायाधीशावर आणि कोर्टातील अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा आरोप देखील केला आहे. व्हिडिओतून आवाहन अतुल याने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ तयार केला असून आपली छळवणूक झाल्याचा आरोप केला आहे. आपल्या अस्तींचे विसर्जन न्याय मिळाल्याशिवाय करू नये, अशी विनंती त्यांनी आपल्या कुटुंबीयांना केली आहे. पत्नीने दाखल केले ९ खोटे गुन्हे सुसाईड नोटमध्ये अतुल याने पत्नीवर हत्या, लैंगिक शोषण, पैशासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्याच्या प्रकरणांसह ९ खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. तसेच, आपल्या मुलाचा ताबा आपल्या आई वडिलांकडे देण्याची मागणी देखील केली आहे. आपल्या आत्महत्येपूर्वी, सुसाईड नोट आणि व्हिडिओची लिंक त्यांनी एका एनजीओच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आरोपांची पडताळणी केली जात आहे.