Team India : हार्दिक पांड्या होणार टी-20 संघाचा कर्णधार, वनडेतून घेतला ब्रेक; उपकर्णधारपदासाठी 2 दावेदार..

Team India & Hardik Pandya T20 Captain : स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार असेल. भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला श्रीलंकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तेवढीच एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेतील तीन सामने अनुक्रमे 27 जुलै, 28 जुलै आणि 30 जुलै रोजी होणार आहे. मात्र, त्यानंतर होणाऱ्या वनडे मालिकेत हार्दिक पांड्या सहभागी होणार नाही.
वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की, “हार्दिक पांड्या भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार होता. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही उपलब्ध आहे. त्यामुळे तो कर्णधार असेल. .” या अहवालात पुढे म्हटले आहे की, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत शुभमन गिल किंवा सूर्यकुमार यादव उपकर्णधार असू शकतात.
भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 क्रिकेटला अलविदा केला. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट बोर्ड या फॉरमॅटसाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. मात्र, हार्दिक पांड्या हा टी-20 मध्ये टीम इंडियाचा कायम कर्णधार असेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.
एकदिवसीय मालिकेबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, पंड्याने वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक मागितला आहे आणि त्याची माहिती नियमित कर्णधार रोहित शर्माला दिली आहे. आणखी एका अहवालात असेही म्हटले आहे की, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भाग घ्यावा असे वाटते.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळल्यास सर्व स्टार क्रिकेटपटूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. मात्र, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना सूट देण्यात आली आहे. तसेच इतर सर्व कसोटी तज्ञांनी ऑगस्टमध्ये दुलीप ट्रॉफीचा किमान एक सामना खेळावा अशी बीसीसीआयची इच्छा आहे. कारण यानंतर संघाला बांगलादेश आणि न्यूझीलंडसोबत कसोटी मालिका खेळायची आहे.





