भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशिया चषक 2025 मध्ये दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून नवव्यांदा विजेतेपद पटकावलं. आता भारतीय संघ ऑक्टोबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर व्हाईट बॉल क्रिकेटसाठी सज्ज होत आहे. हा दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार असून, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय (वनडे) आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दोन मालिका खेळवल्या जाणार आहेत. मात्र, या महत्त्वपूर्ण दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्याच्या दुखापतीचं संकट मीडिया अहवालानुसार, हार्दिक पंड्याला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी-20 मालिकांमधून बाहेर राहावं लागण्याची शक्यता आहे. हार्दिक हा भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून, त्याने आपल्या आक्रमक फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीने अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला त्याची कमतरता निश्चितच जाणवेल. हार्दिकला आशिया चषक 2025 मधील सुपर 4 फेरीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. समालोचक रवी शास्त्री यांनी त्या सामन्यादरम्यान हार्दिकला त्रास जाणवत असल्याचं नमूद केलं होतं. या दुखापतीमुळे हार्दिकला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही मुकावं लागलं होतं, आणि त्याच्या जागी रिंकु सिंहला संघात संधी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनिश्चितता ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यास तीन आठवड्यांचा अवधी बाकी असला, तरी हार्दिकला दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे तो या दौऱ्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. काही अहवालांनुसार, हार्दिक टी-20 मालिकेच्या शेवटच्या काही सामन्यांपर्यंत फिट होऊ शकतो, पण त्याची खेळण्याची शक्यता वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होईल. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे शेड्यूल पहिली वनडे : 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम) दुसरी वनडे: 23 ऑक्टोबर (एडिलेड ओवल) तिसरी वनडे: 25 ऑक्टोबर (एस सी ग्राउंड) पहिला टी20 सामना : 29 ऑक्टोबर (मनुका ओवल) दूसरा टी20 सामना : 31 ऑक्टोबर (एमसीजी) तीसरा टी20 सामना : 2 नोव्हेंबर (बैलेरीव ओवल) चौथा टी20 सामना : 6 नोव्हेंबर (हेरिटेज बैंक स्टेडियम) पाचवा टी20 सामना : 8 नोव्हेंबर (गाबा स्टेडियम)