Nagar : जीवनातील अंधार दूर करण्यासाठी येशूची शिकवण आवश्यक-फादर सुभाष त्रिभुवन

शेवगाव : मनुष्याच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आलेला प्रकाश म्हणजे नाताळ सण असून आज माणूस हरवला आहे. त्याला कुठल्या दिशेने मार्गक्रमण करावे हे समजत नाही. त्यासाठी माणसाचे तारणहार करणाऱ्या येशूच्या शिकवणुकीचा संदेश आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ फादर सुभाष त्रिभुवन यांनी केले.
शेवगावातील विविध चर्चमधून बुधवारी नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गेवराई रस्त्यावरील होली स्पिरिट चर्चमध्ये सकाळी ९ वाजता तेथील प्रमुख फादर सुभाष त्रिभुवन यांनी पवित्र मिसा प्रार्थना केली. यावेळी ते बोलत होते. सहाय्यक धर्मगुरु फादर लुईस रिबेलो, नित्य सेवा हॉस्पिटलच्या सिस्टर ज्युली, सिस्टर बेट्टी, आनंद निवासच्या सिस्टर उज्वला तसेच शेवगाव धर्मप्रान्तातील ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिसा नंतर गायन झाले. नाताळच्या पूर्वसंध्येला मंगळवारी फादर आबा वाघमारे यांनी मिसा केली.
शेवगावात ख्रिश्चन बांधवांची संख्या लक्षणीय आहे. पैठण रोडवरील साल्वेशन आर्मी चर्चमध्ये मेजर पवार यांनी उपस्थित भाविकांना संदेश दिला. संत आंद्रिया चर्चमध्ये रेव्ह. चक्रनारायण यांनी व मदतनीस संदीप मगर, अतुल शिरसाठ तर जुन्या बाजार तळावरील शेवगाव बायबल चर्चमध्ये रेव्हरंड अशोक पंडित यांनी नाताळची भक्ती केली. मंगळवारी संडे स्कूल भक्ती मदतनीस विनोद गायकवाड, सचिन नवगिरे, सिस्टर भोसले यांनी केली. आखेगाव रस्त्यावरील आशीर्वाद प्रार्थना भवन चर्चमध्ये रेव्ह.प्रदीप कोल्हे यांनी तर न्यू बेथील चर्चमध्ये पास्टर प्रकाश पैलवान यांनी तसेच विनियाड चर्चमध्ये पास्टर रतन शिंदे यांनी संदेश दिले.
नाताळ निमित या चर्चमध्ये विविध कार्यक्रम झाले. याशिवाय तालुक्यात चापडगाव, दहिगाव ने , एरंडगाव, दहिफळ, भातकुडगाव, ताजनापूर, सामनगाव,आखतवाडे,वडूले आदी ठिकाणच्या चर्चमधून देखील नाताळ उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती संजय केदारी, रेव्ह. अशोक पंडित यांनी दिली. आज दिवसभर अनेकांनी एकमेकांना भेटून नाताळच्या शुभेच्छा दिल्या.





