शिक्षकांच्या आंदोलनाला यश; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

मुंबई : विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्याने अनुदान देण्याचा निर्णय अद्यापही न झाल्यामुळे हजारो शिक्षक काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी शिक्षकांची भेट घेतली होती आणि त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यासोबत बैठकीसाठी बोलावले होते. त्यानुसार, आज विधीमंडळातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनाला भेट देत याबाबतची घोषणा केली.
गिरीश महाजन म्हणाले, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तुमच्या खात्यात पगार पडेल आणि यापुढे तुमच्या पगाराची तारीख पुढे सरकणार नाही. आमची भूमिका सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला तुमची काळजी आहे. आम्हाला माहिती आहे की, आपण सामान्य कुटुंबातील आहात. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी अतिशय धाडसी निर्णय घेतला होता. त्यानुसार, तुम्हाला 20 टक्के, 40 टक्के आणि त्यानंतर 60 टक्के देण्यात आले होते. मात्र त्यानंतर सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळे आमच्याकडून पुढचे टप्पे देण्यास उशीर झाला आहे, अशी चूक महाजन यांनी मान्य केली.
गिरीश महाजन म्हणाले, तुम्ही याबाबत वारंवार मागणी करत होता. पण आता तुमचा पगारा प्रश्न मार्गी लागलेला आहे. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरले आहे की, आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचा आहे. पण येत्या दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊन येत्या १८ तारखेला अधिवेशन संपणार आहे. त्यावेळी तुमच्या खात्यात पैसे जमा असतील, असे त्यांनी जाहीर केले.





