पुणे – वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतनासाठी आवश्यक असलेली एचटीई सेवार्थ प्रणालीची प्रकरणे उच्च शिक्षण विभागाकडून लवकर मार्गी लागत नाहीत. काही ना काही कारणे दाखवित संबंधित प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना काही महिने वेतनापासून वंचितच रहावे लागत आहे. वेतनच मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या पुढे उभा ठाकला आहे. उच्च शिक्षण विभागातील सेवार्थ प्रणालीमुळे वेतन प्रलंबित राहण्याच्या घटना अनेकदा घडत आहेत. प्रामुख्याने ऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक अडचणी, डेटा एंट्रीतील त्रुटी आणि वेळेवर मंजुरी न मिळणे या कारणांमुळे वेळेत वेतन मिळत नाही. या विरुध्द शिक्षक संघटनांनी अनेकदा आंदोलने करत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र अद्याप पुर्णपणे प्रश्न काही सुटलेला नाही. अनेक वर्ष विभागीय सहसंचालक कार्यालय स्तरावरुन सेवार्थही प्रकरणे सोडविली जात होती. आता मात्र सेवार्थची प्रकरणे मंजूर करण्याबाबतचे विभागीय सहसंचालकांचे अधिकार काढुन घेण्यात आले आहेत. सेवार्थ प्रणालीमध्ये विभागीय सहसंचालक यांच्या लॉगीनमधून नव्याने पदांचा समावेश करणे अथवा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश करणे ही सुविधा रद्द करण्यात आलेली आहे. शिक्षकीय व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या संदर्भात सर्व प्रकारच्या नोंदी घेणे, त्यामध्ये बदल करणे अथवा सुधारणा करणे तसेच त्या अनुषंगाने इतर बदल करणे अशी सर्व प्रकरणे शासनस्तरावरील प्रशासकीय विभागास मान्यतेसाठी सादर करावी लागतात. प्रशासकीय विभागाच्या मान्यतेनंतर विभागीय सहसंचालक यांना टॅब उपलब्ध केल्यानंतर विभागीय सहसंचालकांना पुढील कार्यवाही करता येते. शालेय शिक्षण विभागातील शालार्थ आयडीचे घोटाळे राज्यभरात उघडकीस येत आहे. या पार्श्वभुमीवर उच्च शिक्षण विभागाकडून सेवार्थबाबतच्या प्रकरणांच्या सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करण्याचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे तपासणीच्या नावाखाली सेवार्थची प्रकरणे चार-सहा महिने प्रलंबितच पडत आहेत. सेवार्थबाबतची प्रकरणे तात्काळ मंजूर करुन संबंधित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन सुरु करावे अशी मागणी जोर धरु लागलेली आहे. त्यामुळे आता तरी शासनस्तरावरील प्रशासकीय यंत्रणेला जाग येणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.