नगर -जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा आणणारी 10 जुलै 2020 ची अधिसूचना राज्य सरकारने तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी घरोघरी अन्नत्यात आंदोलन आरंभले आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यात कालपासून हे आंदोलन आरंभले आहे. संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घरोघरी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले.
शहरात शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी पाईपलाइन रोड येथे केलेल्या आंदोलनात जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, रमाकांत दरेकर, कोअर कमिटीचे सदस्य भाऊसाहेब जीवडे, दिलीप रोकडे, अनिता सरोदे, जयमाला भोरे, सुरेश विधाते, प्रदिप बोरुडे, तुकाराम चिक्षे, विजय गरड हाताला काळ्या फिती बांधून सहभागी झाले होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स व शासकीय नियमांचे पालन करुन सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 10 जुलै 2020 रोजी घटनाबाह्य अधिसूचना प्रसिद्ध करून, शिक्षक समुदायाला सेवानिवृत्ती वेतन व भविष्य निर्वाह निधी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केले आहे. ही अधिसूचना घटनाबाह्य व बेकायदेशीर असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.