प्रशासनाचा अजब कारभार : पालिकेचे कर्मचारी निवांत, शिक्षक मात्र तणावात
चार महिन्यांत 74 शिक्षकांना नोटीस
पिंपरी – करोना संक्रमणास सुरुवात झाल्यापासून महापालिकेच्या शिक्षकांना करोना ड्यूटी लावण्यात आली आहे. क्वॉरंटाईन सेंटरमध्ये देखरेख करणे, कन्टेन्मेंट झोनमध्ये सर्व्हेक्षण करणे अशी कामे लावली आहेत. सुरुवातीच्या काळापासूनच महापालिकेने आपल्या अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांना कामाला न लावता पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना यात झोकून दिले.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना करोना संक्रमण होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या नावाखाली दिवसाआड सुट्टी दिली जात आहे. तर दुसरीकडे शैक्षणिक वर्षाची कामे सांभाळत शिक्षकांना जिथे रुग्ण सापडले आहेत, त्या भागात पाठविले जात आहे. राष्ट्रीय कर्तव्याच्या नावाखाली शिक्षकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार शिक्षक करत आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जलद प्रतिसाद टीम तयार केली आहे. या पथकाकडून शहरात रोज सर्वेक्षण केले जाते. पथकात वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यासोबतच शिक्षकांना ही यामध्ये सहभागी करून घेतले आहे. महापालिकेच्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र यातून सोयीस्कररित्या वगळले आहे. शाळांमधील विलगीकरण कक्षाचे व्यवस्थापन करणे, नागरिकांवर देखरेख ठेवणे, निवारागृहातील नागरिकांची नोंद करणे, स्क्रीनिंग करणे, घऱोघऱी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करणे अशी कामे दिली आहे. याव्यतिरिक्त करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे ट्रॅकिंग करणे, व्हॉटसऍपच्या माध्यमातून जनजागृती करणे, आपत्ती निवारण कक्षातील कामकाज पाहणे आदी कामांची जबाबदारी सोपविली आहे.
शिक्षकांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांनाही त्यामध्ये सहभागी करून घेणे अपेक्षित होते. त्यामध्ये अनेक शिक्षकांना आजार असल्याने त्यांनी काम करण्यास नकार दिला. मात्र त्यांच्यावर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांना नोटीस पाठवून रीतसर खुलासा देण्यास सांगण्यात आले. ज्या शिक्षकांनी समाधानकारक खुलासा दिला नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या सेवापुस्तकात लालशाईचा शेरा मारण्यात आला आहे.
मार्च महिन्यापासून 74 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये उपशिक्षक, क्रीडाशिक्षक, लिपिक, अनुरेखक यांचा समावेश आहे. तर चार शिक्षकांनी करोनाच्या भीतीने कन्टेन्मेंट झोनमध्ये जाण्यास नकार दिला. त्यांच्याकडेही खुलासा मागविण्यात आला. शंभर शिक्षकांनी प्रशासनाकडे आजारी असल्याचे कारण सांगत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र त्यातील 74 शिक्षकांना विविध कारणे देत खुलासा मागविला आहे.
सर्व शिक्षकांना प्रशासनाने हे काम लावले आहे. आम्हाला रोज कन्टेन्मेंट झोनमध्ये जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करावे लागते. आमच्या घरी लहान मुले आहेत. आमच्यामुळे त्यांना संक्रमण होण्याचा धोका आहे. क्वॉरंटाईन सेंटरमध्ये काम दिले जात आहे. तिथे कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. तिथे दाखल असलेल्या रुग्णांचा रोष आम्हाला सहन करावा लागतो. रोज काहीनाकाही कुरबुरी सुरु असताता. सर्वेक्षणाला जातानाही तशीच अवस्था असते. नागरिक आमच्यावर रोष काढतात. त्यामध्ये आम्हाला मुलांच्या शिक्षणाचे पण बघायचे आहे. किमान आता तरी आम्हाला प्रशासनाने करोना ड्युटी लावू नये.
– एक त्रस्त शिक्षक
ज्या शिक्षकांनी कामचुकारपणा केला होता. त्यांना आपण खुलासा मागविला होता. ज्यांनी समाधानकारक खुलासा दिला नाही, त्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या सेवापुस्तकात लालशाईचा शेरा मारला आहे.
– राजेश आगळे, प्रशासन अधिकारी.