प्रभात ग्रीन गणेशा-2019′ ही कार्यशाळा केवळ विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित राहिली नव्हती. या कार्यशाळेमध्ये शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रोज विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक यानिमित्ताने मूर्ती घडवण्यामध्ये मग्न झाले होते. या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या बरोबरीने कौशल्यांची जोड देणे आवश्यक असते, या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला वाव मिळाला. या उपक्रमाचे स्वागत अधिकाधिक शाळांनी केले पाहिजे. कोणत्याही बदलाची सुरुवात संस्कारक्षम वयात होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनावर झालेले पर्यावरणपूरक गणरायाची मूर्ती साकारण्याचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहतील, अशी भावना व्यक्त करत शाळांतील शिक्षकांनी उपक्रमाला दाद दिली.
उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या शिक्षकांच्या अनुभवांचा आढावा…
दरवर्षी विद्यार्थ्यांना मूर्ती साकारता यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षकांनाही सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो. स्वत: मूर्ती साकारण्याचे समाधान अनोखे आणि अविस्मरणीय आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना मातीकाम अनुभवण्याची संधी मिळत नाही; परंतु या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मिळणारा सहभाग पाहता, त्यांनी मातीकाम आवडत असल्याचे दिसत आहे. या वयामध्ये विद्यार्थी चांगले बदल आत्मसात करतात. पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्याचा या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होईल. पुढच्या पिढीने पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य आहे. त्यामुळे त्यांच्या संस्कारक्षम वयात त्यांना मूर्तिकलेचे प्रशिक्षण मिळत असल्याचे आम्हाला समाधान वाटते. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील गोष्टी शिकता येत आहेत. ही पिढी त्यांनी सर्जनशीलता आणि कलात्मकता वापरून अधिकाधिक सुबक मूर्ती साकारत आहे, याचा कौतुक वाटते.
शाडूच्या मातीची पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचा अनुभव अनोखा होता. एका विटेतून गणेशाची रेखीव मूर्ती तयार होऊ शकते, याचे प्रशिक्षण आम्हाला या निमित्ताने घेता आले. त्याचबरोबर प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या कार्यशाळेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बालपण अनुभवायला मिळाले. आम्ही तयार केलेल्या या बाप्पा’ची प्रतिष्ठापना यंदा आम्ही करणार आहोत. त्यामुळे ही संधी आमच्यासाठी अविस्मरणीय होती.