Teacher Accident – शासकीय कामांचा अतिरिक्त बोजा आणि त्यातच प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका पुन्हा एकदा एका महिला शिक्षिकेला बसला आहे. घर आणि शाळा सांभाळून तब्बल ४० किलोमीटर अंतरावर जनगणनेचे काम करण्यासाठी गेलेल्या पिंपरखेड येथील महिला शिक्षिकेचा रात्रीच्या वेळी घरी परतताना भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा हात फॅक्चर झाला असून या घटनेमुळे शिक्षकांना इतक्या लांब अंतरावर ड्युटी देण्यासाठी प्रशासनाने नेमका कोणता निकष लावला, असा संतप्त सवाल आता शिक्षक वर्गातून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरखेड येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका प्रियंका भोसले-दाभाडे यांना त्यांच्या घर आणि शाळेपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर जनगणनेचे काम लावण्यात आले होते. त्या सोमवार, दिनांक १८ मे रोजी दिवसभर हे शासकीय काम पूर्ण करून रात्रीच्या वेळी दुचाकीवरून आपल्या घरी परतत होत्या. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास जांबूत (ता. शिरूर) येथे पोहोचताच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात भोसले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे शिक्षकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे. शिक्षकांना सातत्याने विविध अशैक्षणिक कामात जुंपले जाते आणि त्यातही ड्युटी देताना कसलेही योग्य नियोजन केले जात नाही, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. या ढिसाळ नियोजनामुळे शिक्षकांना मोठ्या मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रियंका भोसले यांच्या अपघाताला पूर्णपणे प्रशासनाचा चुकीचा निर्णय आणि नियोजनशून्यताच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. इतक्या लांब अंतरावर ड्युटी लावण्याच्या प्रशासकीय निर्णयामुळे शेवटी महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे काय, असा गंभीर प्रश्न आता विविध शिक्षक संघटना आणि शिक्षक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.