Teacher Election Duty – निवडणुकीसह विविध कामांसाठी प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना आता मूळ शाळेत परतावे लागणार आहे. शिक्षण विभागाने प्रतिनियुक्ती रद्द केली असून, जे शिक्षक मूळ नेमणुकीच्या जागी रुजू होणार नाहीत, त्यांचे मे महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमधील शिक्षक निवडणूक शाखा किंवा इतर सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. या प्रतिनियुक्तीमुळे शाळांमधील शैक्षणिक कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, ९ मे रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत प्रतिनियुक्तीवरील सर्व शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध केले. परिपत्रकानुसार, विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षकांना आपापल्या क्षेत्रातील शिक्षकांना मूळ जागी धाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ शिक्षण विभागाच्या माहितीतीलच नव्हे, तर इतर शासकीय कार्यालयांत कार्यरत असलेल्या शिक्षकांबाबतही संबंधित कार्यालय प्रमुखांशी संपर्क साधून त्यांना कार्यमुक्त करण्यास सांगितले आहे. याचा एकत्रित अहवाल ३१ मे पर्यंत शासनाला सादर करायाला सांगितले आहे.