बीड : बीडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आश्रम शाळेवर तब्बल 18 वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतरही ना पगारीचा पत्ता, ना कायम होण्याची शाश्वती, त्यातच संस्थाचालकांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने एका शिक्षकाने भावनिक फेसबूक पोस्ट लिहून बँकेच्या दारातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
धनंजय अभिमान नागरगोजे मागील 18 वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. 18 वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याचा आरोप केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेनंतर विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न नव्याने चर्चेत आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडच्या घटनेचा उल्लेख करत सरकारपुढे प्रश्न मांडले आहेत. तसेच,शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले. त्याच महाराष्ट्रात शिक्षकाला आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागतो हे राज्याला भूषणावह नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
तसेच, शिक्षकांना आदराने ‘गुरुजी’ म्हटले जाते. हे गुरुजी भावी पिढ्या घडविण्यासाठी सदैव काम करीत असतात. त्यांचे प्रश्न व अडचणी शासनाने समजून घेतल्या पाहिजेत. शासनाने त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक व संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटले तर अशा घटना घडणार नाहीत. दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बीडमधील नागरगोजे यांच्या आत्महत्येबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाची आत्महत्या अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले. त्याच महाराष्ट्रात शिक्षकाला आत्महत्येचा…
— Supriya Sule (@supriya_sule) March 16, 2025
कोण आहेत धनंजय नागरगोजे
धनंजय अभिमान नागरगोजे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी आहेत. ते मागील १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. १८ वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. २०१९ मध्ये राज्य सरकारने या शाळेला २० टक्के अनुदान घोषित केलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही.