पालघर: शाळेत उशिरा आल्याबद्दल एका बारा वर्षीय विद्यार्थिनीला १०० उठाबशांची अमानुष शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेला अखेर गुरुवारी पोलिसांनी अटक केली. वसई येथील सातिवली परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, शिक्षिकेच्या शिक्षेनंतर त्रास होऊन उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला होता. आरोपी शिक्षिकेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वालिव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना ८ नोव्हेंबर रोजी घडली. वसईतील सातिवली येथील एका खासगी शाळेत शिक्षिका ममता यांनी शाळेत उशिरा आलेल्या एका १२ वर्षांच्या विद्यार्थिनीला १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. शिक्षेमुळे मुलीला शारीरिक त्रास सुरू झाला. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सात दिवसांनी म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मुलीच्या मृत्यूनंतर स्थानिक रहिवासी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला. या जनआक्रोशामुळे पोलिसांनी त्वरीत कारवाई करत गुन्हा नोंदवला. दरम्यान, शिक्षा देणारी शिक्षिका ममता यादव यांना त्यांच्या खासगी शाळेतून याआधीच काढून टाकण्यात आले होते. परंतु, गुरुवारी पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.