मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काल २८८ जागांसाठी मतदान झालं. यावेळी राज्यात काही ठिकाणी मोठा गोंधळ झाला तर बाकी ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. या दरम्यान काही अनपेक्षित घटना देखील घडल्या. बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला तर साताऱ्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मतदान केल्यानंतर मृत्यू झाला. यादरम्यान मतदान प्रक्रिया संपल्यानंतर घरी परतताना अपघात होऊन दोन वेगवेगळ्या घटनात दोघांचा मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये शिक्षकाचं निधन झालं तर साताऱ्यात महसूल अधिकारी असणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. जळगावमध्ये काय घडले? जळगाव जिल्ह्यात शिक्षक लक्ष्मीकांत पाटील हे बीएलओ म्हणून मतदान केंद्रावर कार्यरत होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ते बभळाज या गावी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. साताऱ्यात काय घडले? साताऱ्यातही अपघातात महसूल अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निवडणूक प्रक्रियेचं काम संपवून घरी परतताना रोहित कदम या अधिकाऱ्याच्या गाडीचा मध्यरात्री अपघात झाला. अपघातात रोहित कदम हे जागीच ठार झाले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. रोहित कदम हे जावलीतील आनेवाडी गावात ड्युटीवर होते. ते मूळचे भूईंज गावचे होते.