Tea Drinking Time: भारतात चहा हे फक्त पेय नसून दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांचा दिवस गरमागरम चहा पिऊनच सुरू होतो. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी, कामाच्या मधल्या वेळेत थकवा घालवण्यासाठी किंवा मित्रांसोबत गप्पा मारताना चहा पिण्याची सवय सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते चहा पिण्याची योग्य वेळ पाळणं खूप गरजेचं आहे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अनेकांना सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आम्लपित्त, गॅस आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. तसेच, शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढून दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. त्यामुळे उठल्याबरोबर चहा पिणं टाळावं, असा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच चहा पिणंही योग्य नाही. चहामधील घटकांमुळे शरीरात लोहाचं शोषण कमी होतं. त्यामुळे अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणून जेवणानंतर थोडा वेळ थांबूनच चहा घ्यावा. Tea Drinking Time चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्यानंतर साधारण १ ते २ तासांनी. या वेळी चहा प्यायल्यास तो शरीरावर कमी परिणाम करतो आणि त्याचे फायदेही मिळतात. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी चहा घेतल्यास तो शरीरासाठी सुरक्षित ठरतो. रात्री झोपण्यापूर्वी चहा पिणं टाळायला हवं. चहामध्ये कॅफीन असतं, जे मेंदूला सतर्क ठेवतं. त्यामुळे झोप येण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी, झोपेची कमतरता, डोकेदुखी, चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो. म्हणून झोपेच्या काही तास आधी चहा पिणं टाळणं गरजेचं आहे. याशिवाय, चहा पिण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. चहामधील कॅफीनमुळे शरीरात निर्जलीकरण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आधी पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. एकूणच, चहा पिणं चुकीचं नाही, पण त्याची वेळ आणि प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य सवयी अंगीकारल्यास चहा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.