TDS Rules: बँकिंग नियमन कायद्यानुसार ज्या बँका कार्यरत आहेत त्या बँकांमध्ये ग्राहकाच्या व्याजावरील उत्पन्न विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाल्यानंतर स्त्रोतातून कर कपात (टीडीएस)केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण प्राप्तिकर विभागाने केले आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार सर्वसामान्य नागरिकाचे बँक किंवा पोस्ट कार्यालयातील ठेवीवर व्याज 50,000 रुपयापेक्षा जास्त झाल्यास आणि ज्येष्ठ नागरिकांचे व्याज एक लाख रुपयापेक्षा जास्त झाल्यास संबंधित वर्षात टीडीएस लागू होतो. प्राप्तिकर विभागाने समाज माध्यमावर जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की नवीन प्राप्तिकर कायदा 2025 मधील कलम 402 नुसार ज्या बँकिंग कंपन्या बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार कार्यरत आहेत, त्या बँकांना हा नियम सरसकट लागू होतो. हेही वाचा – Rupee: रुपया सावरण्यासाठी RBIचे नवे निर्बंध; दिवसाअखेरीस किरकोळ वाढ, दबाव कायम मात्र एखाद्या नागरिकाचे व्याजातील उत्पन्न वर्षाला 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असेल अशा उत्पन्नावर टीडीएस लागू होणार नाही असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. नवीन प्राप्तिकर कायदा अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार याबाबत काय उपाययोजना आहेत या संदर्भात नागरिकात चर्चा चालू असल्यामुळे प्राप्तिकर विभागाने हे स्पष्टीकरण केले असल्याचे समजले जाते. या समाज माध्यमावरील पोस्टमुळे आता याबाबत सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत.