TCS Q4 results: टीसीएसचा नफा घसरला; 30 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर

मुंबई – भारतातील सॉफ्टवेअर निर्यात करणारी सर्वात मोठी कंपनी असलेल्या टीसीएस कंपनीने गुरुवारी आपला जानेवारी ते मार्च या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला आहे. या ताळेबंदात कंपनीचा ढोबळ नफा 1.68% कमी होऊन 12,224 कोटी रुपये इतका झाला आहे.
तिसर्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर होण्याचा काळ आता सुरू झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करते. या तिमाहीत कंपनीचा महसूल मात्र 5.3 टक्क्यांनी वाढून 64,479 कोटी रुपये इतका झाला आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापाराबाबत कमालीचे नकारात्मक वातावरण निर्माण केले आहे.
अशा परिस्थितीत अमेरिकेत मंदी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये तंत्रज्ञान कंपन्याची नॅशडॅॅक निर्देशांक बराच कमी झाला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावावरही परिणाम झाला होता. आता अमेरिकेने आयात शुल्कावर स्थगिती लावली असली तरी वातावरण पुरेसे स्वच्छ झालेले नाही. त्यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना अतिशय सावध राहून वाटचाल करावी लागणार आहे.
टीसीएस कंपनीचा सरलेल्या वर्षातील नफा 5.76 टक्क्यांनी वाढून 48,553 कोटी रुपये इतका झाला आहे. तर महसूल 5.99 टक्क्यांनी वाढून 2,55,324 कोटी रुपये इतका झाला आहे. ताळेबंद जाहीर करताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के कीर्तीवसन यांनी सांगितले की, सरलेल्या वर्षात आमचा महसूल डॉलरमध्ये तीस अब्ज डॉलरवर गेला आहे. सलग दुसर्या तिमाहीत आमच्या ऑर्डरमध्ये समाधानकारक वाढ झाली आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार आम्ही कंपनीचे धोरण बदलत आहोत. तसेच नवे तंत्रज्ञान स्वीकारून त्यासाठी मनुष्यबळ विकसित करीत आहोत. त्यामुळे सध्याच्या खराब परिस्थितीतही आम्ही अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनी आगामी वर्षात 42 हजार कर्मचार्यांची नियुक्ती करणार आहे. अमेरिकेने आतापर्यंत तरी फक्त वस्तूवर आयात शुल्क जाहीर केले आहे. माहिती तंत्रज्ञान उत्पादनावर आयात शुल्क लावलेले नाही. मात्र एकूण परिस्थितीचा अमेरिकेच्या कंपन्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना ऑर्डर मिळण्यावर परिणाम होऊ शकतो.
प्रति शेअर 30 रुपये लाभांश
कंपनीने सरलेल्या वर्षाचा ताळेबंद जाहीर करताना भागधारकांना प्रति शेअर 30 रुपयाचा लाभांश जाहीर केला आहे. अमेरिकेत व्यापार युद्ध चालू आहे. अशा परिस्थितीत चौथ्या तिमाहीत कंपनीच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होणे अपेक्षित होते. मात्र हा परिणाम अत्यल्प झाला असल्याचे कंपनीने सांगितले. बदलत्या परिस्थितीत जागतिक कंपन्यांना आवश्यक माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादने उपलब्ध करण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे.

