Stock Market: टीसीएस, बजाज फायनान्स, रिलायन्सला विक्रीचा फटका

मुंबई – परदेशी गुंतवणूक परत जात असल्यामुळे शेअर बाजारातील नकारात्मक वातावरण कायम आहे. शुक्रवारी परदेशी गुंतवणूकदारांनी 2,035 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. आजही या गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे निर्देशांक घसरल.े त्याचबरोबर रुपयाच्या मूल्यावर नकारात्मक परिणाम झाला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 217 अंकांनी कमी होऊन 74,115 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 92 अंकांनी म्हणजे 0.41 टक्क्यांनी कमी होऊन 22,460 अंकावर बंद झाला. ज्या कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले त्यामध्ये टीसीएस, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, झोमॅटो, टायटन, महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांचा समावेश होता. पावर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, नेस्ले, एशियन पेंट, आयटीसी, सन फार्मा, आयसीआयसीआय बँकेच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मात्र तरीही निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
अमेरिकेच्या व्यापार धोरणाचा जगातील सर्व बाजारावर परिणाम होत आहे. याचा परिणाम जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही होत असून अमेरिकेत मंदी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असल्याचे जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
मिडकॅप 2.11% तर स्मॉल कॅप 1.46 टक्क्यांनी कमी झाला. आजच्या विक्रीचा फटका तेल आणि नैसर्गिक वायू, भांडवली वस्तू, ग्राहक वस्तू, बांधकाम, ऊर्जा, वाहन, धातू, आरोग्य आणि दूरसंचार क्षेत्रांना बसला.
इंडसइंड बँकेचा शेअर कोसळला
इंडसइंड बँकेचा शेअर आज चार टक्क्यांनी कोसळला. या बँकेने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी कथपलीया यांचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवावा अशी विनंती रिझर्व बँककडे केली. होती मात्र रिझर्व बँकेने तीन वर्षाऐवजी केवळ एक वर्ष मुदत वाढ देण्यास होकार दिला आहे. यामुळे या बँकेच्या व्यवस्थापनासंदर्भात दीर्घपल्ल्यात अनिश्चितता निर्माण झाली आहे असे गुंतवणूकदारांना वाटत आह. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या बँकेच्या शेअरची विक्री केली. राष्ट्रीय शेअर बाजारात या बँकेचा शेअर 3.71 टक्क्यांनी कमी होऊन 901 रुपये 95 पैसे प्रति शेअर या पातळीवर गेला होता. या अगोदरही रिझर्व बँकेने मुख्य कार्यकारी अधिकार्याचा कार्यकाळ तीन वर्षाऐवजी एक वर्ष वाढविण्यास मंजुरी दिली होती.
रुपयाचे मूल्य कोसळले 38 पैशांनी ; परकीय गुंतवणूक कमी होत असल्याचा परिणाम
– खनिज तेलाच्या दरात अस्थिरता असली तरी हे दर आता 70 डॉलर पेक्षा कमी आहेत. अमेरिकेच्या अस्थिर व्यापार आणि परराष्ट्र धोरणामुळे अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत आहे. मात्र तरीही सोमवारी रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत 38 पैशांनी कोसळून 87 रुपये 33 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. भारतीय शेअर बाजारातून परकीय गुंतवणूक एकतर्फी कमी होत असल्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा कमी होत आहे. त्याचा दबाव रुपयाच्या मूल्यावर येत असल्याचे चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले.
5 फेब्रुवारी रोजी रुपयाचा भाव 39 पैशाने कोसळला होता. त्यानंतर आज पुन्हा मोठी घट झाली आहे. सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स सोमवारी 0.15 टक्क्यांनी कमी होऊन केवळ 103.65 इतका नोंदला गेला आहे. एक महिन्यापूर्वी हा निर्देशांक 110 अंकाच्या पुढे होता. यामुळे रुपयाला काही प्रमाणात आधार मिळाला. अन्यथा रुपयाचा भाव आणखी कोसळला असता.
खनिज तेलाचे दर सध्या 70 डॉलर प्रति पिंप या पातळीवर आहेत. त्यामुळेही रुपयाला काही प्रमाणात आधार मिळत आहे. मात्र परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून शुक्रवारी 2,035 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री झाली. सोमवारीही शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. याचा जास्त परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला.
महागाई वाढण्याची भीती
रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत कमी झाल्यास भारताला आयात मगात पडते. महाग आयात वस्तूंमुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता असते. सरकार महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच रुपयाचा भाव कमी होत असल्यामुळे महागाई कमी करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे ही परिस्थिती नजीकच्या भविष्यात सुधारण्याची शक्यता कमी आहे.




