Taylor Swift: पॉप क्वीन टेलर स्विफ्टचा साखरपुडा; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

Taylor Swift: अमेरिकेची लोकप्रिय पॉप सिंगर, अभिनेत्री आणि निर्माता टेलर स्विफ्टने तिचा बॉयफ्रेंड ट्रॅविस केल्ससोबत साखरपुडा केला आहे. ही आनंदाची बातमी दोघांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिलं.
टेलर आणि ट्रॅविसने बागेत काढलेल्या सुंदर प्रपोजलच्या फोटोंची झलक इन्स्टाग्रामवर टाकली आहे. एका फोटोमध्ये ट्रॅविस एका गुडघ्यावर बसून टेलरला प्रपोज करताना दिसतोय, तर दुसऱ्या फोटोमध्ये टेलरच्या हिऱ्याच्या अंगठीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. मजेदार कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, “तुमचे इंग्रजी शिक्षक आणि जिम शिक्षक आता लग्न करत आहेत.”
दोघांची ओळख कशी झाली?
टेलर स्विफ्ट आणि ट्रॅविस केल्सची पहिली भेट 2023 मध्ये झाली होती. तेव्हा ट्रॅविस टेलरच्या एरास टूर कॉन्सर्टला गेले होते. त्यांना टेलरला फ्रेंडशिप ब्रेसलेट द्यायचं होतं, पण ते जमलं नाही. नंतर त्यांच्या पॉडकास्टवर हा किस्सा शेअर केल्यामुळे टेलरला त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि इथूनच त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली.
गेल्या वर्षभरात दोघांना एनएफएल गेम्सपासून टेलरच्या कॉन्सर्टपर्यंत अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं. आता त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, सगळे त्यांच्या लग्नाच्या प्रतिक्षेत आहेत.





