प्रभात प्रभाव; स्थायी समितीचा निर्णय पिंपरी – तब्बल 45 दिवसांच्या लॉकडाऊननंतर तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने अटी शिथील केल्यानंतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने अडेलतट्टू भूमिका घेत कर भरण्याची अट टाकली होती. याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने आजच्या (शुक्रवार) अंकात प्रसिद्ध केली होते. त्यानंतर याबाबत स्थायी समितीमध्ये चर्चा झाली व ही जाचक अट रद्द करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे व शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यातील 3 मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर 17 मे पर्यंत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवे बरोबरच इतरही काही दुकाने सुरू करण्यासंदर्भात परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तशा पद्धतीचे निवेदन प्रसिद्धीस दिले असून महापालिकेच्या संकेतस्थळावर परवानगीसाठी अर्ज उपलब्ध करून दिला आहे. हा अर्ज सादर करताना महापालिकेचा मार्च 2020 पर्यंतचा मिळकतकर भरल्याची पावती अर्जासोबत जोडण्याची अट ठेवण्यात आली आहे. गेल्या 45 दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या आणि हैराण झालेल्या व्यापाऱ्यांकडून परवानगीच्या देण्याच्या नावाखाली सुरू केलेल्या करवसुलीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी व पालिकेच्या अडेलतट्टू धोरणाबाबतचे वृत्त दैनिक प्रभातने शुक्रवार दि 8 मे रोजीच्या अंकात व 7 मे रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी हा मुद्दा उपस्थित करून व्यापाऱ्यांबाबत घेतलेल्या करसंकलनाच्या अटीमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी केली. इतरही सदस्यांसह स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनीही व्यापाऱ्यांनी अडवणूक करू नये, अशी भूमिका घेत मिळकतकर भरण्यास सवलत द्यावी तसेच अर्जासोबत मिळकतकर भरल्याबाबतची पावती जोडण्याची अट रद्द करण्याचे आदेश यावेळी प्रशासनाला दिले. मिळकतरामध्ये सूटही मिळणार सध्या सर्वांवरच आर्थिक संकट असल्यामुळे महापालिकेने व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना मिळकतकरामध्ये सूट देण्यात यावी, असे प्रशासनाला सुचविल्याचे स्थायीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आयुक्तांनी मिळकत कराबाबत योग्य निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, कायद्यातील बाबी तपासाव्यात तसेच कोणाचीही अडवणूक करू नये, अशा सूचना करण्यात आल्याचेही लोंढे म्हणाले.