विविधा: तात्यासाहेब कोरे

माधव विद्वांस

सहकारमहर्षी विश्‍वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांची आज जयंती. त्यांचा जन्म दि. 17 ऑक्‍टोबर 1914 रोजी पन्हाळा तालुक्‍यातील कोडोली येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे ते लहान असतानाच निधन झाले. त्यांच्या चुलतीनेच त्यांचे संगोपन केले.त्यांच्या वडिलांनी कालांतराने दुसरा विवाह केला. त्यानंतर त्यांना आणखी भावंडे मिळाली. त्यांचे घर गोकुळसारखे भरले होते. त्यांच्या वडिलांनी व चुलत्यांनी एकत्रितपणे आपला वडिलोपार्जित व्यवसाय वाढविला होता. त्यामुळे व्यावहारिक व्यवसायाचे बाळकडू मिळाले होते. ते लहान असताना त्यांच्या घरावर दरोडा पडला होता, त्याचा त्यांच्या बालमनावर ठसा उमटला होता. त्यांच्या कल्पना व कष्टातून आज वारणानगर ही सहकाराची पंढरी झाली आहे. येथे शिक्षण, रोजगार, अर्थकारण, राजकारण आहे.

संस्कृती व संस्कार जोपासले आहेत. विविध शाखांतील शैक्षणिक सुविधा देणारे ग्रामीण भागातील हे एकमेव आदर्श केंद्र तात्यासाहेबांच्या कर्तृत्वाने उभे राहिले आहे. तात्यासाहेबांनी सन 1939 मध्ये कोल्हापूरला स्थापन झालेल्या प्रजापरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी सार्वजनिक कार्यास सुरुवात केली.
स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार यांचे ते निकटवर्ती होते. प्रतिसरकारच्या भूमिगत क्रांतिकारकांना आश्रय दिला होता. आज घराघरात वारणेचे दूध पोहोचले आहे आणि वारणेची साखर त्याची गोडी वाढवत आहे. कोडोली जवळचा माळ एकेकाळी उजाड होता. तेथे गवतही उगवत नव्हते तेथे आज तात्यासाहेबांच्या कल्पकतेने नंदनवन उभे राहिले आहे.

सन 1959 मध्ये तात्यांच्या स्वप्नातील साखर कारखाना वास्तवात आला. 6 नोव्हेंबर 1959 रोजी प्रत्यक्ष साखरेचे उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला या साखर कारखान्याची गाळप क्षमता 1 हजार टीसीडी होती ती आता 10 हजार टीसीडी आहे. त्यावेळी चांदोलीचे धरण झालेले नव्हते, वारणेचे पाणी वाहून जात होते. त्यावर उपसा जलसिंचनद्वारे पाणी आणून ऊस पिकविण्याचे धाडस केले. त्यांनी वारणेवर 4 बंधारे आणि 65 सहकारी पाणीपुरवठा संस्था उभ्या केल्या. एवढ्यावर न थांबता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे यासाठी पूरक उद्योगही त्यानी सुरू केले, दुग्धोपादन सुरू करून शेतकऱ्यांचे घरातील महिलांनाही सक्षम केले. आज वारणा हे नावच दुधाची ओळख झाले आहे. साखरेबरोबर कागद आणि विद्युत निर्मिती हे साखर कारखान्याचे पूरक उद्योगही उभे केले.

आज वैद्यकीय क्षेत्रातील आयुर्वेदिक, दंतचिकित्सा यांचे अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत तसेच त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वदूरच्या विद्यार्थ्यांनाही होत आहे. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगमधील विविध शाखांतील शिक्षणही उपलब्ध आहे. आज येथे संगणक, कला, वाणिज्य, व्यवस्थापन, लष्कर, अभियांत्रिकी, विज्ञान अशा नानाविध शिक्षण देणारी 18 शैक्षणिक संकुले उभी आहेत.

त्यांना विधानसभेसाठी उमेदवारीही मिळत होती पण राजकारण हे माझे क्षेत्र नाही म्हणून त्यांनी नम्रतापूर्वक नकार दिला. त्यांनी वारणा उद्योग समूह आपले कुटुंब मानले व त्याचा विकास हाच ध्यास जपला. कारखाना हे मंदिर व सहकार ही तपश्‍चर्या या भावनेतून सहकाराचा स्वाहाकार होऊ दिला नाही. त्यांच्या घरातून त्यांना मोठी साथ मिळाली. त्यांची भावंडेही त्यांच्या मागे उभी राहिली व कारखान्याच्या जडणघडणीत सहभागी झाली. त्यांचे चिरंजीव विनय कोरे त्यांचा वारसा पुढे चालवीत आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटचे ते उपाध्यक्ष होते.तसेच अनेक संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. 13 डिसेंबर रोजी या सहकार महर्षींचे निधन झाले. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर आमुचे जुळती.

Leave A Reply

Your email address will not be published.