Mahendra Dalvi : दोन ते चार दिवसांत तटकरे मोठा निर्णय घेणार; शिवसेना आमदाराच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
Mahendra Dalvi : माणगाव नगरपंचायतीतील माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे अनेक नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Mahendra Dalvi : रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या राजकीय संघर्षादरम्यान माणगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. माणगाव नगरपंचायतीतील माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे अनेक नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशानंतर महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच तटकरे येत्या दोन ते चार दिवसांत काही वेगळा राजकीय निर्णय घेऊ शकतात, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
‘आमचा विरोध राष्ट्रवादीला नाही, तर तटकरेंना आहे’
पक्षप्रवेश सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना महेंद्र दळवी म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, सुनील तटकरे यांना आमचा विरोध आहे आणि तो आजही आहे, उद्याही राहील.”
तटकरे कार्यकर्त्यांना मोठे करण्याऐवजी पक्षाबाहेरचा रस्ता दाखवतात!
दळवी यांनी पुढे बोलताना अजित पवार यांच्या निधनानंतरही तटकरे यांच्याकडून केली जाणारी वक्तव्ये योग्य नसल्याचे म्हटले. अजित पवार यांना जाऊन नऊ महिने झाले असताना तटकरे यांची वक्तव्ये समोर येत आहेत.
तटकरे यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी कार्यकर्त्यांना मोठे करण्याऐवजी अनेकांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला, असा आरोप महेंद्र दळवी यांनी केला. आगामी काळात जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असे आव्हानही त्यांनी दिले.
दरम्यान, माणगावमधील राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेतील प्रवेश आणि महेंद्र दळवी यांनी केलेली टीका यामुळे रायगडमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता सुनील तटकरे या आरोपांना काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





