मुंबई – एअर इंडिया ही कंपनी सध्या मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. एअर इंडिया म्हणजे केवळ उद्योग नसून टाटा समूहासाठी ही एक जबाबदारी आहे, असे टाटा सन्स कंपनीचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. भारतातील नागरी विमान वाहतूक उद्योग सध्या काही अडचणीतून जात आहे असे सांगून त्यांनी सांगितले की, विमानाचे सुट्टे भाग, विमाने आणि विमानासाठी असलेल्या पायाभूत सुविधा यासाठी आपल्याला जागतिक पातळीवरील घटकावर अवलंबून राहावे लागते. विविध कारणामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झालेला आहे. त्याचा परिणाम भारतातील इतर नागरी विमानवाहतूक कंपन्या बरोबरच एअर इंडिया कंपनीवर आहे होत आहे. यातून शक्य तितक्या लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न एअर इंडिया करत असते. पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे आम्ही केलेल्या प्रत्येक नियोजनात वेळोवेळी बदल करण्याची वेळ येते. विमान वाहतूक उद्योगात भांडवल जास्त असते तर नफा फारच कमी असतो. जेआरडी टाटा यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा समूहाने एअर इंडियाला एक उद्योग म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून स्वीकारले आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न टाटा समूह आपल्या परीने आगामी काळात करत राहणार आहे. प्रचंड तोट्यात असलेली एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस टाटा समूहाने जानेवारी 2022 मध्ये अधिग्रहित केली आहे. मात्र पुरवठा साखळीतील अडथळ्यामुळे पूर्ण क्षमतेने ही विमान कंपनी चालविण्यात अनेक अडथळे येत आहेत. मात्र हे अडथळे पार करून आम्ही आगेकूच करणार आहोत. अडथळे असले तरी आम्ही कमालीचे आशावादी आहोत. कारण राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्का वाढ झाल्यानंतर विमान वाहतूक क्षेत्राची दोन टक्के वाढ होते. सध्या विकासदर सध्या आठ टक्के आहे. म्हणजेच विमान वाहतूक क्षेत्र सोळा टक्क्यांनी वाढणार आहे असे ते म्हणाले.