Tata Sons : टाटा सन्सच्या इतिहासात पहिल्यांदाच AGM स्थगित; कोरमअभावी 108 वी वार्षिक बैठक लांबणीवर
Tata Sons : टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी टाटा सन्सची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरम पूर्ण न झाल्याने स्थगित करण्यात आली आहे. कंपनीच्या इतिहासात असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.

Tata Sons : टाटा समूहाची मूळ होल्डिंग कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’ची मंगळवारी आयोजित केलेली १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) अचानक स्थगित करण्यात आली आहे.
बैठकीसाठी आवश्यक असलेली सदस्यांची किमान उपस्थिती (कोरम) पूर्ण न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या संपूर्ण इतिहासात एजीएम स्थगित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही बैठक १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार होती.
महत्त्वाच्या विषयांवर होणार होती चर्चा –
या वार्षिक बैठकीत अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर निर्णय अपेक्षित होते. यामध्ये प्रामुख्याने टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या संचालकपदाचा (डायरेक्टरशिप) विषय चर्चेत होता.
चंद्रशेखरन यांनी १४ ऑगस्ट रोजीच चेअरमनपदाचा राजीनामा दिला असून, फेब्रुवारी २०२७ मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर पुढील मुदतवाढ न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते २० फेब्रुवारी २०२७ पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
टाटा समूहातील आपल्या ४० वर्षांच्या प्रवासावर बोलताना चंद्रशेखरन म्हणाले, “टाटा समूहामध्ये मी माझ्या व्यावसायिक कारकिर्दीची ४० वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रतिष्ठित संस्थेच्या वाटचालीत योगदान देण्याची संधी मिळाली, याबाबत मी अत्यंत समाधानी व कृतज्ञ आहे. गेल्या दशकात टाटा सन्सचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आणि अत्यंत जबाबदारीचा काळ राहिला आहे.”





