Tata Motors share price: टाटा मोटर्सचा शेअर पीछाडीवर; 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 44 टक्क्यांची घट

Tata Motors share price: गेल्या दीड वर्षापासून टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरच्या भावात बरीच घट झाली आहे. 52 आठवड्याच्या उच्चांकापासून हा शेअर 44 टक्क्यांनी कमी झाला आहे. निफ्टी 50 मध्ये सर्वात वाईट कामगिरी टाटा मोटर्सच्या शेअरने केली आहे. अशा परिस्थितीत टाटा मोटर्सच्या गुंतवणूकदारांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण झाले असल्याचे दिसून येते.
जुलै 2024 मध्ये टाटा मोटर्सच्या शेअरचा भाव 1,179 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. सध्या या कंपनीच्या शेअरचा भाव 661 रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे. या कालावधीमध्ये टाटा मोटर्सचे बाजार मूल्य तब्बल 1.9 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
शेअर घसरण्याचे कारण –
टाटा मोटर्सच्या अधिपत्याखालील जग्वार लँड रोव्हरच्या कारची विक्री चीन, ब्रिटन इत्यादी देशांमध्ये गेल्या काही वर्षापासून वेगाने कमी होत आहे. हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. हा प्रश्न असतानाच आता अमेरिका भारतावर अमेरिकन कारच्या आयात वाढविण्यासाठी दबाव आणत आहे.
अशा परिस्थितीत अमेरिकन कारवरील शुल्क कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम टाटा मोटर्सबरोबरच भारतातील इतर वाहन उत्पादकावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. व्यवसायिक वाहनांची विक्री कमी होत आहे. त्याचबरोबर देशातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी टाटा मोटर्सला चांगलेच आव्हान दिले आहे. टेस्ला कंपनी भारतात येण्याच्या शक्यतेचाही बराच परिणाम या क्षेत्रावर होत आहे.
शेअर निर्देशांक जैसे थे –
दरम्यान भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूक परत जात असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून 14% करेक्शन झाले आहे. अशा परिस्थितीत निर्देशांक दिशा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स केवळ दहा अंकांनी वाढून 74,612 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दोन अंकांनी कमी होऊन 22,545 अंकावर बंद झाला.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालूच असून मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 3,529 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशात आणि परदेशात नकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बरेच गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत तर काही विक्री करून नफा काढून घेत आहेत.


