Job Cuts : टाटा समूहाच्या कंपनीत 4000 नोकऱ्यांवर संकट; ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय
Job Cuts : टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरमध्ये ब्रिटनमध्ये 4 हजार नोकऱ्या कमी करण्याची तयारी. वाढता खर्च, कमकुवत मागणी आणि अमेरिकेच्या आयात शुल्काचा कंपनीला फटका.

Job Cuts : टाटा समूहाच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हर (JLR) या लक्झरी कार कंपनीसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. वाढता खर्च, वाहनांची कमी झालेली मागणी आणि अमेरिकेने आयात केलेल्या कारवर लावलेले शुल्क यामुळे कंपनीवर खर्च कमी करण्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत ब्रिटनमध्ये सुमारे ४ हजार नोकऱ्या कमी करण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे.
‘द टाइम्स’च्या वृत्तानुसार, जेएलआरकडून सोमवारी या कर्मचारी कपातीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. कंपनीने शुक्रवारीच आपल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिल्याचे सांगितले जात आहे.
ब्रिटनमध्ये ३४ हजार कर्मचारी –
जेएलआरच्या ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड्स आणि मर्सीसाइड येथील हेलवुड कारखान्यांमध्ये सुमारे ३४ हजार कर्मचारी काम करतात. कंपनीच्या व्यवसायामुळे ब्रिटनमधील पुरवठा साखळीत सुमारे १.२० लाख नोकऱ्यांना अप्रत्यक्षपणे आधार मिळतो.
या पार्श्वभूमीवर प्रस्तावित कर्मचारी कपात मोठी मानली जात आहे. टाटा मोटर्सचे माजी वित्त प्रमुख पीबी बालाजी यांनी जेएलआरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कंपनीचा नफा वाढवणे आणि खर्च कमी करण्यावर भर दिला आहे.
कंपनीच्या नफ्यात मोठी घट –
जून २०२६ मध्ये संपलेल्या तिमाहीत जेएलआरच्या उत्पन्नात सुमारे १० टक्क्यांची घट झाली. त्याच काळात कर भरण्यापूर्वीचा नफा दोन-तृतीयांशपेक्षा जास्त घसरून १०.९ कोटी पौंडांवर आला.
कंपनीने पुढील दोन वर्षांत सुमारे १.७ अब्ज पौंडांची बचत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचबरोबर वर्षाला सुमारे ३ लाख वाहनांची विक्री झाल्यास कंपनीचा नफा-तोटा समसमान पातळीवर आणण्याचे उद्दिष्ट आहे.
अमेरिकेच्या शुल्काचाही फटका –
ब्रिटनमधून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कारवर १० टक्के आयात शुल्क लागू आहे. याचा जेएलआरच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. उत्तर अमेरिका हा कंपनीचा सर्वात मोठा बाजार असून, जेएलआरच्या जागतिक विक्रीत या बाजाराचा वाटा सुमारे २९ टक्के आहे.
याशिवाय, मागील वर्षी झालेल्या सायबर हल्ल्याचाही कंपनीला मोठा फटका बसला. या हल्ल्यामुळे जेएलआरचे कामकाज काही काळ मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते.
कंपनीची रचना सोपी करण्यावर भर –
जागतिक बाजारातील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कंपनीला काही कठोर निर्णय घ्यावे लागत असल्याचे जेएलआरने म्हटले आहे. संघटनेची रचना अधिक सोपी करणे, कामकाजातील कार्यक्षमता वाढवणे आणि कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत करणे यावर भर दिला जाणार आहे.
कंपनीने वेतनधारी आणि व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती किंवा स्वेच्छेने नोकरी सोडण्याची योजना सुरू केली आहे. पुढील काळात कर्मचारी कपातीबाबत अधिक माहिती दिली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.





