1999 मध्ये कारगिल युद्धात लष्कराला सतर्क करणारे ताशी नामग्याल यांचे लडाखमध्ये निधन

जम्मू – वर्ष १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान भारतीय लष्कराला पाकिस्तानच्या घुसखोरीबद्दल सावध करणारा लडाखी मेंढपाळ ताशी नामग्याल यांचा नुकताच आर्यन व्हॅलीमध्ये मृत्यू झाला. ते 58 वर्षांचे होते. ताशी नामग्याल यांना 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आले होते.
मे 1999 च्या सुरुवातीला, ते आपल्या हरवलेल्या याकचा शोध घेत असताना, त्यांनी पठाणी पोशाखात पाकिस्तानी सैनिकांना बटालिक पर्वत रांगेत बंकर खोदताना पाहिले. हे पाहून नामग्याल यांनी तात्काळ भारतीय लष्कराला माहिती दिली, त्यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तानच्या गुप्त मोहिमेची महत्त्वाची माहिती मिळाली. या सतर्कतेने भारतीय लष्कराच्या प्रतिसादाला आकार दिला आणि युद्धाचा मार्ग बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
3 मे ते 26 जुलै 1999 या काळात झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने श्रीनगर-लेह महामार्ग तोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला. नामग्याल यांच्या तत्परतेने भारतीय सैन्याच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्यांना शूर काउबॉय म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे लडाख आणि संपूर्ण देशात शोककळा पसरली असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.





