Tasawade MIDC Blast – तासवडे, ता. कराड येथील औद्योगिक वसाहतीतील एसकेएस फाईन केमिकल या कंपनीत सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटाने सुमारे दहा किलोमीटरचा परिसर हादरला. स्फोटानंतर कंपनीच्या इमारतीला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोट आणि आगीमुळे कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तासवडे येथील औद्योगिक वसाहतीत उंब्रजमधील सर्जेराव किसन साळुंखे यांच्या मालकीची एसकेएस फाईन केमिकल नावाची कंपनी आहे. या कंपनीत सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास शिफ्ट सुरू होण्यापूर्वी मोठा स्फोट झाला. त्यामुळे परिसर हादरला. त्यानंतर एकापाठोपाठ आठवेळा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस उपअधिक्षक राजश्री पाटील यांच्यासह तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग नियंत्रणात आणण्यासाठी कराड पालिका, सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि जयवंत शुगरच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून तीन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. स्फोटाचे नेमके कारण अस्पष्ट स्फोटाचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. कंपनीत रासायनिक पदार्थांच्या उत्पादनाशी संबंधित प्रक्रिया चालू असल्याने, स्फोटाचे कारण रासायनिक प्रतिक्रिया किंवा प्रक्रियेत झालेली त्रुटी असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.