करोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या फ्रंट लाइन वर्कर्सच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला. तर अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
अशातच आता करोना काळात कर्तव्यावर असताना प्राण गमावलेल्या मुंबई पोलिसांचं योगदान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभिनेत्री तापसी पन्नूने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
करोना संकटात कर्तव्यावर असताना 118 पोलिसांचा मृत्यू झाला.शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तापसीने म्हटले आहे की, “तुम्हाला माहीत आहे, या सर्व लोकांमध्ये एकाच गोष्टीचं साम्य आहे,
ओळखू शकता? नाही ना, चला मी तुम्हाला एक हिंट देते. हे सगळे तुमच्या कुटुंबाशी जोडलेले आहेत. अरे, तरीही नाही ओळखलंत तुम्ही यांना?”
“ठीक आहे, काहीच हरकत नाही. तसंही हे सगळे पदड्यामागूनच काम करतात. या सगळ्यांचा मृत्यू झालाय… करोनामुळे. जेणेकरून तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहील.
आपल्या लोकांची काळजी घेणं, त्यांची रक्षा करणं, हाच तर आहे कुटुंबाचा अर्थ. जे आपल्यासाठी आपला जीव गमावू शकतात, ते आपले सख्खे नाहीत तर मग कोण आहेत?”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतो आहे. चाहत्यांनी तापसीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच कमेंट्स करत करोना संकटात प्राण गमावलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहीली आहे.
दरम्यान, तापसी पन्नूचा आगामी ‘हसीन दिलरूबा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच तापसीने या चित्रपटाचं शुटींग पूर्ण केलं आहे. दिग्दर्शक विनील मॅथ्यू यांचा हा चित्रपट 2 जुलै 2021 रोजी रिलीज करण्यात येणार आहे.