तामिळनाडू सरकारने हिंदी भाषाविरोधाची धार केली आणखी तीव्र, आता थेट रुपयाचे चिन्हच बदलले

MK Stalin Govt | गेल्याकाही दिवसांपासून तामिळनाडूमधील स्टॅलिन सरकारने केंद्र सरकारच्या कथित हिंदी लादण्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्राद्वारे केंद्र सरकार हिंदी लादत असल्याचा आरोप सरकारने केला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये हिंदी भाषा सुरू करण्यास सरकारकडून नकार देण्यात आला आहे. त्यातच आता तामिळनाडू सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील ₹ चे चिन्ह तमिळ भाषेत बदलले आहे.
तामिळनाडूमध्ये सध्या द्रमुकचे सरकार आहे. सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात ‘₹’ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह वापरले आहे. हे चिन्ह तमिळ लिपीतील ‘रु’ अक्षर आहे. चिन्हात केलेल्या बदलांबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
गेल्या एका दिवसांपासून केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये हिंदीवरून वाद सुरू आहे. केंद्र सरकार नवीन शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा धोरण लागू करण्यास सांगत आहे. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, त्यात स्थानिक भाषा देखील समाविष्ट आहे. मात्र. तामिळनाडू सरकारचा हिंदी भाषेला विरोध आहे. स्टॅलिन यांनी एनपीईला ‘भगवे धोरण’ म्हटले आहे.
शिक्षण धोरणाबाबत बोलताना स्टॅलिन म्हणाले की, ‘एनईपी हे शिक्षण धोरण नाही, तर भगवे धोरण आहे. त्याचा उद्देश भारताचा विकास करणे नाही तर हिंदीचा विकास करणे हा आहे. आम्ही NEP ला विरोध करतो. कारण यामुळे शिक्षण क्षेत्रातील तामिळनाडूची प्रगती पूर्णपणे नष्ट करेल.’
आता राज्याच्या अर्थसंकल्पातून थेट रुपयाचे चिन्हच बदलण्यात आल्याने याची चर्चा होत आहे. भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी देखील यावरून मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला आहे. देशभरात या चिन्हाचा वापर केला जातो. हे चिन्ह बदलण्याएवढे कोण मूर्ख कसे असू शकते? असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.





