राज्यपालांनी विद्यार्थ्यांना द्यायला लावल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा, विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी

TN Governor RN Ravi Controversy | तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मदुराई येथील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कथितरित्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सांगितल्यामुळे राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे.
मदुराईच्या त्यागराज अभियांत्रिकी महाविद्यालयात एका कार्यक्रमात राज्यपाल रवी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला होता. कार्यक्रमात त्यांनी तमिळ साहित्यिक कंबर आणि त्यांच्या कंब रामायण या रामायणाच्या आवृत्तीचे सांस्कृतिक महत्त्व सांगितले. याच दरम्यान, त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सांगितल्या.
या घटनेनंतर सत्ताधारी DMK पक्षाने राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांवर राजकीय हेतूने धार्मिक घोषणा देण्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, अशा कृतींमुळे शिक्षण संस्थांतील धर्मनिरपेक्षतेचा भंग होतो.
After being slammed by the Supreme Court and blocked by the State Government, he’s now resorting to stunts like making students chant ‘Jai Shri Ram’ just to irritate the system. Clearly frustrated, he’s sending a message that “Even if the courts rule against me, I will find other… pic.twitter.com/qSxIL1NQje
— Sasikanth Senthil (@s_kanth) April 13, 2025
स्टेट प्लॅटफॉर्म फॉर कॉमन स्कूल सिस्टीम (SPCSS) या शैक्षणिक संघटनेनेही राज्यपाल रवी यांना हटवण्याची मागणी केली आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “सरकारी अनुदानित महाविद्यालयातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विशिष्ट धार्मिक घोषणांसाठी उद्युक्त करणे हे घटनात्मक पदाचा गैरवापर आहे.”
आर. एन. रवी यांनी याआधीही राज्य विधेयकांवर मंजुरी न देण्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाची नाराजी ओढवून घेतली आहे. आता ‘जय श्रीराम’ घोषणांमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, त्यांनी फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं नमूद केलं. दरम्यान, आर. एन. रवी यांनी विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सांगितल्याने तामिळनाडूमधील राजकारण तापले आहे.





