चेन्नई : तमिळनाडू सरकारने अभिनेते विजय यांच्या सभेतील चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी आयोग स्थापन केला. तर, केंद्रीय गृह मंत्रालयाने तमिळनाडू सरकारकडून त्या दुर्घटनेचा अहवाल मागवला. करूरमधील दुर्घटनेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी शनिवारी रात्री सचिवालयात तातडीची बैठक घेतली. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. बैठकीत स्टॅलिन यांनी स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी दुर्घटनेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश अरूणा जगदीशन यांचा समावेश असणाऱ्या आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली. त्याशिवाय, स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी १० लाख रूपयांची मदतही जाहीर केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीवरून स्टॅलिन आणि तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी स्थितीचा आढावा घेतानाच केंद्राकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून चेंगराचेंगरीला कारणीभूत ठरलेल्या स्थितीविषयीचा तपशील मागवला आहे.