फलटण (प्रतिनिधी) -मुळची मुंबई येथील रहिवासी असलेली 94 वर्षीय वृद्ध व्यक्ती 15 मे रोजी तांबवे (ता. फलटण) येथे आली होती. या वृद्ध व्यक्तीचा घरीच मृत्यू झाला होता. मात्र तरीही या वृद्धचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. रविवारी या व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. दरम्यान, फलटण तालुक्यातील करोना बाधितांचा आकडा वाढतच असून तांबवे, सस्तेवाडी, साखरवाङी, होळ, वडले, जोरगांव ही गावे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
याआधी तांबवे येथील कोरियात गेलेली विद्यार्थीनी आणि एक छोटी मुलगी करोना पॉजिटिव्ह झाली होती. त्यानंतर मुंबई येथून आलेला 94 वर्षीय वृद्ध व्यक्ती मृत्यू नंतर करोनाबाधित असल्याचे अहवालनंतर स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या वृद्धास कोणत्याही प्रकारणी करोनाची लक्षणे नव्हती. मात्र तरीदेखील संबंधित मृत वृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण गाव हादरुन गेले आहे. सध्या तांबवे गाव भीतीच्या छायेखाली असून या वृद्धांच्या संपर्कात आलेल्याची तपासणी करुन होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने गावामध्ये जंतूनाशक फवारणी सुरु केली आहे. तसेच पोलीस बंदोबस्त चोख ठेऊन गावातील कुणालाही बाहेर न येण्याची सक्त ताकीद प्रशासनाने देऊन ताबडतोब उपाययोजना सुरु केल्या आहेत. आसपासच्या गांवामध्ये सुद्धा उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.