Tamarind candy: लहानपणीचे काही गोड-टवटवीत स्वाद आयुष्यभर विसरता येत नाहीत. 90 च्या दशकातील मुलांना चिंचेचे लाडू नक्की आठवत असतील. शाळेतून बाहेर पडताच भैय्याकडे मिळणारे आंबट-गोड लाडू हा त्या काळाचा खास आनंद. आता तोच स्वाद घरीच सोप्या पद्धतीने पुन्हा तयार करून पाहूया. चिंचेचे लाडू खास का? चिंचेचा आंबटपणा, गुळाची गोडी आणि वर मसाल्यांची चव हे सगळं मिळून हा छोटासा लाडू तोंडात गेल्यावर अगदी वितळून जायचा. फक्त लाडू नव्हता, तर शाळेतल्या मैत्रीची, खोड्यांची आणि हसण्याची आठवणही हा लाडू होता. आजही हा स्वाद अगदी ताजाच वाटतो. आणि हा लाडू तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता. तुमच्यासोबत तुमच्या मुलांनाही तुमच्या बालपणाचा स्वाद चाखता येईल. काय लागेल? सुमारे 200 ग्रॅम चिंच किंवा 150 ग्रॅम चिंचेचा गर (बिया काढलेला) 150 ग्रॅम गूळ 1 टीस्पून भाजलेले जिरं पुड 1 टीस्पून लाल तिखट (चवीनुसार कमी-जास्त) 1 टीस्पून काळं मीठ चिमूटभर पांढरं मीठ 1 टीस्पून आमचूर पावडर (ऐच्छिक) अर्धा कप पिठीसाखर कसा बनवायचा चिंचेचा लाडू? 1. चिंच स्वच्छ करा – बिया आणि सगळे धागे काढून टाका. 2. चिंच गर थोड्या वेळ पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर हाताने घासून त्याचा प्युरीसारखा गर तयार करा. 3. गूळ किसून घ्या, जेणेकरून तो सहज मिसळेल. 4. पॅनमध्ये गूळ हलक्या आचेवर वितळवा. 5. त्यात लाल तिखट, काळं मीठ, जिरे पावडर आणि इतर मसाले घालून छान मिसळा. 6. आता तयार केलेला चिंचेचा गर घालून हे मिश्रण कढई सोडेपर्यंत शिजवा. 7. मिश्रण घट्ट झाले की प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. 8. थंड झाल्यावर हाताला थोडं तेल लावून छोटे-छोटे लाडू बनवा. 9. प्रत्येक लाडूला पिठीसाखरेत घोळवून कोट करा. कसा स्टोअर कराल? तयार लाडू एअरटाइट काचेच्या बाटलीत ठेवून अनेक दिवस टिकवू शकता. लहान असोत किंवा मोठे चिंचेचे लाडू सगळ्यांनाच आवडणार, आणि तुमचं बालपण पुन्हा जिवंत होणार!