तळेगाव ढमढेरे -येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकामधील अंगणवाडीतील खोल्यांची रंगरंगोटी करून बोलक्या भिंतीचे काम युनायटेड वे ऑफ कंपनीमार्फत करण्यात आले आहे.
येथील पिंगळे स्मारक अंगणवाडी येथील वर्गखोल्यांना रंगकाम करून आतील बाजूच्या भिंतीवर बोलकी चित्रे काढली आहेत. भिंतीवर इंग्रजी, मराठी मुळाक्षरे, अंक उजळणी, फुलांचे प्रकार, प्राण्यांचे प्रकार, फळांचे प्रकार व इतर वस्तू आदी चित्रे काढल्यामुळे मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यास मदत होईल.
लहान वयातच मुलांना या सर्वांची माहिती मिळेल. सहकार्याच्या भावनेतून हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक अंगणवाडी येथील वर्गखोल्यांना रंगरंगोटी करून बोलकी चित्र काढून देण्यात आली. युनायटेड वे ऑफ कंपनी मुंबई यांनी केलेल्या आकर्षक रंगकाम आणि बोलकी चित्र यामुळे वर्गात मुलांना शिक्षणात मदत होत आहे.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे अंगणवाडी गेल्या 23 वर्षांपासून मुलांना शिक्षण देण्याचे काम करत आहे. अंगणवाडीमध्ये एकूण 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन शिक्षिका आणि दोन मदतनीस असा एकूण चार महिलांचा स्टाफ आहे. शाळेत शिक्षण घेऊन मुले मोठ्या पदावर काम करत आहेत. परंतु शाळेसाठी लागणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. काही पदाधिकारी अप्रत्यक्षरीत्या मदत करून या अंगणवाडीला मोठा हातभार लावत आहे.