पिंपरी | विलिनीकरणाच्या चर्चेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचज

लोणावळा, {विशाला पाडळे} – शरद पवार आपल्या पक्षातील सर्व आमदार, खासदारांसह पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करणार असल्याच्या चर्चेने मावळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. खरेच असे झाल्यास आपले अस्तित्व काय राहील याची चिंता त्यांना सतावत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने मात्र याचा इन्कार केला आहे. विलिनीकरणाची शक्यता कमी आहे. अलीकडेच राष्ट्रवादीने आपल्या पक्षाचे नवे नाव निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. चिन्हाचा निर्णयसुद्धा लवकरच घेण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या महाविकास आघाडीचे शरद पवार हेच निर्माता आहेत.
अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे उद्धव ठाकरेंसोबतच काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत चांगले संबंध निर्माण झाले आहेत. सुमारे पंधरा वर्षे आघाडी व त्यानंतर अडीच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात त्यांनी शाबूत ठेवली होती. एकेकाळी मावळ तालुका हा कॉंग्रेसचा त्यानंतर भाजपचा आणि आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मावळवर एकहाती वर्चस्व आहे. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपने त्यांच्या अस्तिवाला धक्का दिला. तर नुकताच अजित पवार यांनी शरद पवारांना मोठा धक्का दिल्याने मोजकेच आमदार त्यांच्याकडे शिल्लक आहेत.
सध्याची राजकीय परिस्थिती आणि भाजपचे राजकारण बघता काँग्रेसमध्ये सहभागी होणे हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे त्यांचीसुद्धा ताकद वाढणार आहे. एकत्रिकरण झाल्यास राजकीय फायद्या तोट्याची चाचपणी केली जात असल्याचे समजते. महाराष्ट्रातील चारदोन नेत्यांचा अपवाद वगळता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कोणी विरोध करेल असे दिसत नाही. केंद्रातील काँग्रेसचे नेते नेहमीच शरद पवार यांचा आदर करतात. त्यांची ताकदही सर्वांना ठावूक आहे.
शरद पवार सोबत असेल तर भाजपला पराभूतसुद्धा करता येऊ शकते. उद्धव ठाकरे यांचीही अडचण आता राहिलेली नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा भाजपच हा एकमेव राजकीय शत्रू आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्यास आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही असे तालुक्यातील एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. असे असले तरी तालुका पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अडचण होऊ शकते.
निवडून येण्याची क्षमता महत्वाची
सध्याच्या राजकारणात निवडून येण्याची क्षमता हा मुद्दा महत्वाचा मानला जातो. सध्या मावळ तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता एकाही पदाधिकाऱ्याकडे नाही. काँग्रेसचे नेतेही सहजासहजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी आपल्या जागा सोडतील असे दिसत नाही.





