काबूल – अफगाणिस्तानमधील सत्तांतर आणि त्यानंतर मानवी हक्कांच्या पायमल्लीच्या विविध घटनांच्या पार्श्वभुमीवर ताब्यात घेतलेल्या तिघा पत्रकारांची तालिबानने सुटका केली आहे. हे तिघेही तोलो न्यूज या वृत्तवाहिनीचे पत्रकार आहेत.
या पत्रकारांना ताब्यात घेतल्यानंतर तालिबानवर जगभरातून जोरदार टीका व्हायला लागली होती. त्या पार्श्वभुमीवर तालिबानने या सर्वांची सुटका केली आहे. ताब्यात घेतलेल्या या तिघांमध्ये टोलो न्यूजचे डायरेक्टर खपुलवाक सपाई, मोबी ग्रुपचे कायदेशीर व्यवस्थापक नाफी खलीक आणि तोलो न्यूजचे सादरकर्ते बहराम अमान यांचा समावेश आहे.
तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर परदेशी वाहिन्यांवरील नाटके प्रक्षेपित करण्यास मज्जाव केला होता. त्याविरोधात टोलो न्यूजने टीकात्मक वार्तांकन करायला सुरुवात केली होती. त्यामुळे तालिबानने या तिघांना अटक केली होती. मात्र या अटकेच्या नि,ेधार्थ जगभरातून तालिबानवर जोरदार टीका व्हायला लागली होती.
संयुक्त राष्ट्राच्या अफगाणिस्तानमधील दूतावासानेही या तिघांच्या सुटकेची मागणी तालिबानकडे केली होती. अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनीही या तिघांच्या सुटकेसाठी आवाज उठवला होता.