काबुल : अफगानिस्तानावर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणींसमोर दुसरेच मोठे संकट उभे राहिले आहे. तालिबानने काही दिवसांपूर्वी त्यांच्या ताब्यात येत असलेल्या प्रांतांच्या मौलवींकडून ठिकठिकाणच्या 15 वर्षांवरील तरुणी आणि विधवा महिलांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते. तसेच तालिबानचे दहशतवादी घरोघरी जाऊन तरुणींचा शोध घेत होते. या महिलांना उचलून नेत सेक्स गुलाम बनविले जात होते. तालिबानचे हे कृत्य इराक आणि सीरियामध्ये असलेल्या इस्लामिक स्टेटच्या क्रूरतेसारखेच आहे. ही संघटना महिलांना सेक्स गुलाम बनविण्यासाठी कुख्यात आहे. तेथील काही महिलांनी कशीबशी सुटका करून घेऊन आयएसआयएस दहशतवाद्यांच्या कृत्याचा भांडाफोड केला होता. आता तालिबानने मागविलेल्या यादीतील मुलींना तालिबानच्या दहशतवाद्यांशी लग्न करावे लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय दबाव कमी होताच तालिबानने हिंसा करण्यास सुरुवात केली आहे. अफगानिस्तानमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. तालिबानने तरुणी आणि विधवा महिलांची यादी मागविली होती. यावर अद्याप मौलवींनी काम केले की नाही याची माहिती उपलब्ध झालेली नाही. जबरदस्तीने लग्ने लावली तर या महिलांना पाकिस्तानच्या वजीरीस्तान येथे नेले जाईल आणि पुन्हा त्यांना प्रशिक्षण देऊन प्रामाणिक इस्लाममध्ये परावर्तित केले जाईल. तालिबानने 1996 मध्ये महिलांचे शिक्षण, रोजगार आदीपासून दुर ठेवत त्यांना बुरखा वापरण्यास बंधनकारक केले होते. तसेच पुरुषाशिवाय बाजारात जाण्यावर बंदी आणली होती. तसेच काहीसे क्रूर निर्णय तालिबान घेण्याची शक्यता आहे. तसे संकेत दिले असून महिलांना गेल्या 20 वर्षांत मिळालेले स्वातंत्र्य एका रात्रीत पारतंत्र्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर सेक्स गुलामांच्या नरकातही आयुष्य जगण्याची टांगती तलवार या महिलांवर आली आहे.