तळेगाव दाभाडे,(वार्ताहर) – जानेवारी अखेर नगर परिषदेकडून मालमत्ता कर 35 टक्के वसूल झाला आहे. मार्च अखेर १०० टक्के मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कडक कारवाईच्या धोरणाचा अवलंब करावा लागला तरी करणार, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दै. ‘प्रभात’शी बोलताना दिला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण 38 हजार मालमत्ता धारक आहेत. यामध्ये मालमत्ताकराच्या माध्यमातून नगर परिषदेस 32 कोटी 95 लाख रुपये मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये जानेवारी अखेर 35 टक्के म्हणजेच 11 कोटी 58 लाख रुपये मालमत्ता धारकाकडून जमा झाले असल्याचे कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी सांगितले. या शंभर टक्के वसुलीमध्ये कोर्ट कारवाईच्या माध्यमातून 12 कोटी रुपये येणे बाकी आहे. तर शासकीय, निमशासकीय मालमत्ता मधून 55 लाख रुपये येणे बाकी आहे. ती जमा झाल्यास मार्च अखेर 52 दिवसांत शंभर टक्के उद्दिष्टासाठी नगरपरिषदेला 8 कोटी 82 लाख रुपये वसूल करणे आवश्यक असल्याचे कर निरीक्षक विजय शहाणे यांनी सांगितले. मार्च अखेर पर्यंत मालमत्ता कर वसुलीसाठी नगरपरिषदेने मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन घंटागाडीद्वारे ध्वनीक्षेपकावरून केले आहे. तळेगाव हद्दीमध्ये एकूण 32 मुख्य ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे. या गोष्टी करून देखील मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरला नाही तर थकीत मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन बंद करणे, जंगम व स्थावर मालमत्ता सील करणे तसेच थकित मालमत्ता धारकांचे घरासमोर हालगी वाद्य वाजवणे. तसेच जप्तीची नोटीस बजावून जप्ती करण्यात येणार असल्याचे कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी सांगितले. दोन विशेष पथकांची नियुक्ती मालमत्ता कर वसुलीसाठी तळेगाव गावभाग व स्टेशन भाग असे दोन भाग केले आहेत. यामध्ये दोन विशेष पथकांची वाहनांसह नेमणूक केली आहे. यामध्ये वसुलीसाठी नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश केला असल्याचे उपमुख्य अधिकारी ममता राठोड यांनी सांगितले. तळेगावातील मालमत्ता धारकाकडून पाणीपट्टी एकूण मागणी नऊ कोटी चार लाख, पाच फेब्रुवारी पर्यंत वसुली दोन कोटी 86 लाख रुपये असून ही वसुली 31.68% झाली आहे नागरिकांनी त्वरित पाणीपट्टी भरावी असे आवाहन.जयंत मदने – पाणीपुरवठा कर अधीक्षक तळेगावच्या विकासासाठी तसेच शासकीय भरघोस अनुदान प्राप्त करण्यासाठी तळेगावकर नागरिकांनी त्वरित मालमत्ता कर भरून सहकार्य करावे. – एन. के. पाटील, मुख्याधिकारी