तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. १५) एकूण सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी दिली. गेल्या पाच दिवसांत एकही अर्ज नोंदला गेला नव्हता, मात्र शनिवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक एक अ मधून संविद संजय पाटील, प्रभाग क्रमांक चार ब मधून किरण सुरेश ढोरे, प्रभाग क्रमांक पाच अ आरती नितीन धोत्रे (भाजप), प्रभाग क्रमांक आठ ब मधून महेश भीमराव पवार, प्रभाग क्रमांक १२ ब मधून अनुप तानाजी भेगडे, प्रभाग क्रमांक १४ ब मधून अर्चना अभिजीत ढोले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश दापकेकर यांनी सांगितले की, उर्वरित दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होऊ शकतात. त्यासाठी नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र विभागणी करून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षीय निर्णयांमधील विलंबाचा परिणाम महामंडळातील महायुतीत उमेदवार निवडीबाबत अद्याप स्पष्टता नसल्यामुळे अर्ज दाखल करण्यात विलंब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीतून लढत आहेत. तर महाविकास आघाडीतून शिवसेना (उबाटा), काँग्रेस (आय), राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. दोन्ही आघाड्यांमध्ये इच्छुकांकडून कागदपत्रे तपासून घेण्याची धावपळ सुरू झाली आहे. काही उमेदवार अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.